Pune : कोंढव्यातील 2 इमारतीमधील 4 फ्लॅट फोडून अडीच लाख लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात बंद फ्लॅट घरफोडण्याचा ट्रेंड सुरूच असून, विशेषतः कोंढव्यात या चोरट्यांनी गेल्या काही दिवसांत मोठा गोंधळ घातला असून, दोन इमारतीत चार फ्लॅट फोडून अडीच लाख रुपये चोरून नेले आहेत. त्यातल्या दोन फ्लॅटमध्ये काही मिळालेले नाही. भरदिवसा हे फ्लॅट फोडले आहेत.

याप्रकरणी झुकरिया शेख (वय 38, रा. कोंढवा-खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हे कोंढवा खुर्द येथील हालीमा अपार्टमेंटमध्ये राहण्यास आहेत. दरम्यान सकाळी घर बंद करून ते बाहेर गेले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या शेजारी बंद असलेला फ्लॅट देखील फोडला. तसेच या भागातील दिशा रेसिडेन्सी या इमारतीत देखील चोरट्यांनी घुसून दोन फ्लॅट फोडले आहेत. चोरट्यांनी दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळात हा धुमाकूळ घातला आहे. चार फ्लॅट फोडून 2 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सुदैवाने चोरट्यांना यातील दोन फ्लॅटमधून काही मिळालेले नाही.
दरम्यान भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या गस्तीवर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस तपास करत आहेत.