Pune : युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकने दोघांना नगर जिल्ह्यातून अटक केली आहे. खूनप्रकरणात आतापर्यंत नऊ जणांस अटक झाली आहे.

संदीप उर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते (वय २३, रा. लोहियानगर) आणि लखन मनोहर ढावरे (वय ३०, रा.सहकार चौक, पंढरपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. काल फरासखाना पोलीसांनी प्रशांत उर्फ सनी कोलते (वय 25), राहुल श्रीनिवास रागीर (वय 22), रोहित कमलाकर कांबळे (वय 22, घोरपडी पेठ), रोहित दत्तात्रय क्षीरसागर (वय 21, गंजपेठ) यांना अटक केली. तर त्यापूर्वी तिघांना अटक केली होती. याबाबत मारटकर यांचे मेहुणे राहुल भगवान आलमखाने (वय ४३,रा. गवळी आळी, विजयानंद चित्रपटगृहाजवळ, बुधवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून शुक्रवारी मध्यरात्री खून करण्यात आला होता. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे ते चिरंजीव होते. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पहिल्या दिवशीच तीन आरोपींना अटक केली होती. तर, रविवारी चौघांना पकडले होते. या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार असल्यामुळे गुन्हे शाखेची दोन पथके त्यांच्यावर होती.

पोलिस निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने त्यांना नगर जिल्ह्यातील काष्टी येथून अटक केली आहे.