Pune : बंडगार्डन रस्त्यावरील कुमार बिझनेस सेंटरममधील 2 ऑफिस फोडली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात बंद घरफोडण्याचे प्रकार सुरू असताना चोरट्यांनी आता बंद दुकान फोडण्याकडे मोर्चा वळवला असून, बंडगार्डन रस्त्यावरील कुमार बिझनेस सेंटरममधील दोन ऑफिस फोडण्यात आले आहेत. सुदैवाने मात्र चोरट्यांच्या हाती काही लागलेले नाही.

याप्रकरणी गणेश मोरे (वय ३४, रा. विवेकनगर, आकुर्डी) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन रस्त्यावरील केबीसी सेंटरमध्ये टाटा एआयएफ लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय आहे. फिर्यादी हे या ठिकाणी नोकरीस आहेत. दरम्यान तीन दिवसांपूर्वी काम संपल्यानंतर संबंधित कार्यालय बंद करण्यात आले होते. त्यावेळी चोरट्यांनी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या शौचालयाच्या खिडकीतून आत प्रवेश केला. तसेच चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गल्ल्यात रोकड नसल्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. चोरट्यानी याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील कोटक सिक्युरिटी कंपनीचे ऑफिस देखील फोडले आहे. तेथे देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण हाती काही लागले नाही. अधिक तपास महिला निरीक्षक मनीषा टूले या करत आहेत.