ब्रेकिंग : ‘कोरोना’ व्हायरसच्या पार्श्वभुमीवर चीनमधून परतलेले 2 जण पुण्याच्या नायडू हॉस्पीटलमध्ये ‘निगराणी’खाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –चीनमध्ये कोरोना व्हायरसनं थैमान घातले आहे. कोरोना या आजाराच्या पार्श्वभुमीवर चीनहून परतलेल्या पुण्यातील दोघांना महापालिकेच्या नायडू हॉस्पीटलमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. हे दोघे पुण्याचे रहिवासी असून चीनमधून मुंबई एअरपोर्टवर आल्यानंतर त्यांना सर्दी आणि खोकल्याची सौम्य लक्षणं आढळल्यानं केवळ आणि केवळ खबरदारी म्हणून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघांपैकी एकजण दि. 10 जानेवारी तर दुसरा 13 जानेवारीला चीनमधून भारतात आलेला आहे. दरम्यान, त्या दोन्ही रूग्णांना कोरोना व्हायरसचे संशयित रूग्ण अद्याप तरी म्हणता येणार नाही.

याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले की, दोघांपैकी एक जण हा फार्मासिटीकल कंपनीच्या कामासाठी सुमारे 6 दिवसांपुर्वी चीनमधील शांघाय येथे गेला होता. तर दुसरा देखील खासगी कंपनीसाठी कामानिमित्त चीनमध्ये गेला होता. ते अनुक्रमे दि. 10 जानेवारी आणि दि. 13 जानेवारीला भारतात परतले. हलका खोकला आणि सर्दीच्या लक्षणांमुळं केवळ आणि केवळ फक्त खबरदारी म्हणून त्यांना नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूग्णालयाच्या विलगिकरण कक्षात त्यांना दाखल करण्यात आले आहे. दोघांपैकी एकाच्या घशातील स्त्रावाचे नमुणे पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान (एनआयव्ही) येथे पाठविण्यात आले असून दुसर्‍या रूग्णाचे नमुने मंगळवारी (दि. 28) रोजी पाठविण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने चीनहून परतलेल्या सर्वांनाच निगराणी खाली ठेवण्यास सांगितलेले आहे. त्याच पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून पुण्यातील दोघांना निगराणीखाली नायडू रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. आतापर्यंत मुंबईतील 3 संशयिताचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये.

– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका