पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील 2 पोलिस कर्मचार्‍यांचं तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – “वजनदार” पोलीस कर्मचाऱ्याच्या लाचप्रकरणात गुन्हे शाखेच्या दोन पोलिसांची नावे असल्याने त्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

प्रसाद मोकाशी व संदीप साबळे अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर याप्रकरणात एसीबीने विलास तोगे याच्यासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी व अमली विरोधी पथकाने वारजेत एक कारवाई केली होती. त्यात डिव्हीआर जप्त केला होता. तसेच वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यात फिर्याद संदीप साबळे यांनी दिली होती.

यानंतर डीव्हीआर परत देण्यासाठी व अटक न करण्यासाठी तोगे यांनी खासगी व्यक्तिमार्फत 50 हजार रुपये मागितले. त्यातले 38 हजार रुपये घेतले. उर्वरीत 12 हजार मागणी केल्यानंतर एसीबीकडे तक्रार केली होती. त्यात लाच मगितल्याप्रकरणी तोगे व खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

मात्र याप्रकरणात कारवाई करणाऱ्या खंडणी विरोधी पथकातील दोघांची नावे देखील एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदार यांनी घेतली आहेत. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तडकाफडकी दोघांचे निलंबन केले आहे. मात्र यात कॉल रेकॉर्डिंग किंवा इतर काही पुरावा नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वरिष्ठांकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखेच्या नावाने पैसे मागितले याबाबत का हे तपासले जात आहे.