Lockdown : पुण्यात किराणा दुकानात गाय छापची विक्री ! व्यापार्‍याकडे 5000 ची मागणी करणारे 2 पोलिस तडकाफडकी ‘निलंबीत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किराणा दुकानात गायछाप विक्री करत असताना आढळून आल्यानंतर त्या दुकानदारावर कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांच्याकडे 5 हजाराची मागणी करत 2300 रुपये घेणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, सकाळी घडना घडली; दुपारी तक्रार आली आणि रात्री कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी हे आदेश दिले आहेत.

पोलीस शिपाई (बक्कल क्रं. 8200) हर्षल मांढरे आणि (8302) सागर सूर्यवंशी अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शहरात संचारबंदी लागू आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवांची विक्री परवानगी देण्यात आली आहे. त्यात किराणा दुकान, भाजीपाला, मेडिकलचा समावेश आहे. मात्र अनेक ठिकाणी किराणा दुकानाच्या आडून काहीजण सिगारेट, तंबाखू आणि गुटख्याची विक्री करत असल्याचे कारवाईतून निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून हद्दीत घातली जात आहे. बेकायदेशीर गोष्टीवर कारवाई केली जात आहे.

दरम्यान मांढरे आणि सूर्यवंशी हे कोंढवा पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यावेळी त्यांना 25 एप्रिल 2020 रोजी खडीमशीन चौकीच्या परिसरात मार्शलची ड्युटी दिली होती. त्यादरम्यान एका किराणा दुकानात दोघे गेले. तसेच त्यांना तुम्ही काय विक्री करता फक्त अत्यावश्यक वस्तू विक्रीस परवानगी आहे असे म्हणून दुकानाची झडती घेतली. त्यावेळी त्यांना एका भरणीत तंबाखूच्या पुढ्या असल्याचे आढळून आले. ही बाब समोर आल्यानंतर त्यांनी विरिष्ठांना कळवून कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र या दोघांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. तसेच त्यांनी दुकानदाराकडे 5 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर एका अनोळखी महिलेच्या माध्यमातून त्यांच्याकडून 2300 रुपये घेतले.

त्यानंतर दुकानदाराने कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. त्यावेळी ही घटना समोर आली. वरिष्ठ निरीक्षकानी याची चौकशी केली. त्यावेळी पैसे घेतले असल्याचे दिसून आले. चौकशीकरून हा अहवाल परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्याकडे पाठविण्यात आला. त्या दोघांना याबाबत खुलासा करण्याबाबत सांगण्यात आले. मात्र त्यांनी खुलासा केला नाही. यानंतर उपायुक्त सुहास बावचे यांनी दोघांचे पोलीस खात्यातून निलंबन केले आहे.

दरम्यान सकाळी घटना घडली; काहीवेळाने तक्रार आली आणि त्यावर चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात आल्याचा प्रकार पोलीस दलात प्रथमच घडली आहे.