५००० ची ‘चिरीमिरी’ घेतल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यातील दोघे तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – १०० नंबरला कॉल आल्याचे सांगत हडपसर परिसरातील मुलांच्या रूममध्ये घुसून त्यांना गोंधळ घालता म्हणून कारवाईची धमकी देत त्यांच्याकडे २० हजार रूपयाची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रूपये स्विकारल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस उपायुक्‍त प्रकाश गायकवाड यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे. संबंधित पोलिस कर्मचार्‍यांच्या विरूध्द आलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अहवाल हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठांकडूनच उपायुक्‍त कार्यालयास पाठविण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी सुमित अशोक ताम्हाणे आणि नामदेव सर्जेराव बंडगर अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस कर्मचार्‍यांची नावे आहेत. दि. २७ मे रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोलिस कर्मचारी ताम्हाणे आणि बंडगर हे तक्रार करणार्‍यांच्या रूममध्ये गेले होते. तुम्ही गोंधळ करत असून त्याबाबत १०० नंबरवर कॉल आला होता. आता तुमच्या विरूध्द कारवाई करावी लागेल असे ताम्हाणे आणि बंडगर यांनी त्यांना सांगितले. त्यावर आम्ही चांगल्या घरातील मुले आहोत. आम्ही केवळ गप्पा मारत होतो आणि गाणे म्हणत होतो असे तक्रार करणार्‍यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, ताम्हाणे आणि बंडगर यांनी त्यांचे काही एक न ऐकता त्यांच्याकडे प्रकरण मिटविण्यासाठी २० हजार रूपयाची मागणी केली. शेवटी दोघांनी ५ हजार रूपये स्विकारले. त्यानंतर संबंधित मुलांनी हडपसर पोलिस ठाण्यात ताम्हाणे आणि बंडगर यांच्याविरूध्द तक्रार अर्ज केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तांबे यांनी तक्रार अर्जाची तात्काळ दखल घेत अर्जाची चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशी दरम्यान ताम्हाणे आणि बंडगर हे दोषी असल्याचे निष्पन्‍न झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी त्याबाबतचा अहवाल पोलस उपायुक्‍त कार्यालयास पाठविला. पोलिस उपायुक्‍त प्रकाश गायकवाड यांनी तात्काळ पोलिस कर्मचारी ताम्हाणे आणि बंडगर यांना निलंबीत केले.

Loading...
You might also like