दुर्दैवी ! तुमचे पती 24 तासांत जातील; डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तासभर अगोदरच पत्नीनं सोडले प्राण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जन्मानंतर मृत्यू अटळ असते. पण काही मृत्यू हे अनेकांना जिव्हारी लावून जातात. असाच एक प्रकार पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे गुरुवारी (दि. 25) घडला आहे. लिवर आणि किडनी निकामी झालेल्या पती 24 तासापेक्षा जास्त काळ जगणार नाहीत, डॉक्टरांचे हे शब्द ऐकून पत्नी व्यथित झाली. पतीशिवाय आयुष्याची कल्पनाही न केलेल्या पत्नीने पतीच्या निधनाच्या एक तासा अगोदर आपला प्राण सोडला. दोघांनी मिळून परलोकाचा प्रवास एकत्रच केला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

दिनकर पांडुरंग दणाणे (वय 75) आणि कांताबाई दिनकर दणाणे (वय 69) असे मृत्यू पावलेल्या पती- पत्नीची नावे आहेत. 1972 साली दुष्काळी परिस्थितीत सांगलीच्या कवठेमहांकाळ येथून पुण्यातील खडकवासला येथे कामाच्या शोधात आलेले दणाणे दाम्पत्य. आपल्या बोलक्या, प्रेमळ स्वभावामुळे परिसरातील नागरिकांशी आपुलकीने जोडले गेले. दिनकर दणाणे यांना केंद्रीय जल विद्युत संशोधन केंद्रात नोकरी मिळाली. पती-पत्नीने आयुष्यभर कष्ट करून दोन मुले आणि एका मुलीचे आयुष्य घडवले. 2006 साली सेवानिवृत्त झालेल्या दणाणे यांना मधुमेहाचा आजार होता. त्यातून त्यांची किडणी आणि लिवर निकामे झाले.

25 मार्च रोजी डॉक्टरांनी दणाणे यांच्या कुटुंबियांना सांगितले होते की, 24 तासांपेक्षा जास्त काळ जगणार नाहीत. डॉक्टरांचे शब्द ऐकून कांताबाई व्यथित झाल्या. मुलांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सुमारास कांताबाई यांना तीव्र स्वरूपाचा हृदविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या एक तासाच्या आत दिनकर दणाणे यांनीही प्राण सोडला. अत्यंत साध्या राहणीमानात आयुष्य काढलेल्या कांताबाई यांनी प्रत्येक निर्णयावेळी पतीची साथ दिली. आपले पती हे त्यांच्यासाठी सर्वस्व होते. पतीच्या आजारपणात त्यांनी पुर्ण काळजी घेतली. अत्यवस्थ झालेल्या पतीच्या अगोदर कांताबाईनी मृत्यूला कवटाळले आणि आयुष्यभर एकजीवाने राहीलेल्या पती-पत्नीने अंतिम प्रवासही सोबतच केला आहे.