क्राईम स्टोरीताज्या बातम्यापुणे

Pune News : फसवणूक करणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक, होता तब्बल 22 वर्षापासून फरार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध १९९८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो बेळगाव व इतरत्र रहात होता. गेल्या काही वर्षांपासून तो पुण्यात रहात असला तरी पोलिसांच्या हाती तो लागत नव्हता. तब्बल २२ वर्षांनी गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाला त्याला पकडण्यात यश आले आहे. संदीप सुधाकर धायगुडे (रा. माधवबाग सोसायटी, शिवतीर्थनगर, कोथरुड) असे त्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल युनिट ४ यांनी पोलिसनामा ऑनलाईनला माहिती दिली की चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात १९९८ मध्ये संदीप धायगुडे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तो सदाशिव पेठेत रहात होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यावर तो फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा अनेकदा शोध घेतला पण तो पोलिसांच्या कधी हाती लागला नाही.

दरम्यान फरार आरोपींचा शोध घेण्याविषयी एमओबीकडून दरवेळी पोलिसांना माहिती दिली जाते. अशा आरोपींचा शोध घेत असताना युनिट ४ कडील पोलीस नाईक सचिन ढवळे यांना माहिती मिळाली की, संदीप धायगुडे हा कोथरुड येथील पायस बंगल्यामध्ये भाड्याने रहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक शशिकांत शिंदे, हवालदार रुपेश वाघमारे, पोलीस नाईक सचिन ढवळे, दत्ता फुलसुंदर यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी त्याला चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Back to top button