Pune : अतिवृष्टीमुळे विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन व ऑफलाईन विषयाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून गुरुवारी होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो तसेच इंटरनेट संबंधी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच अतिवृष्टीमुळे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचण येऊ शकते.

या सर्व कारणांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व विषयांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर होईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.