पुणे विद्यापीठाचा निर्णय ! परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना करणार परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   गेल्या वर्षी कोरोनामुळे अंतिम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला होता. या विद्यार्थ्यांची परीक्षा न झाल्याने त्यांचे परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. मात्र ही प्रक्रिया राबविताना झालेला खर्च यातून वगळण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतल्याची माहिती कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना परीक्षा शुल्क परत करावे, यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सभागृहाच्या दाराला धक्के मारून कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यामुळे बैठकीच्या कामात अडथळा निर्माण झाला. वारसा स्थळ असलेल्या वास्तूमध्ये अशा प्रकारे आंदोलन केल्याने याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली जाणार असल्याचे कुलगुरु डॉ. करमळकर यांनी सांगितले.