Pune : पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ पद्धतीने होणार परीक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्राची परीक्षा 15 मार्च पासून ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ही परीक्षा ऑनलाइन होणार असली तरी ती विद्यार्थ्यांच्या मोबाइल किंवा लॅपटॉपवर होणार की महाविद्यालय स्तरावर याचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात समजेल.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक आज (मंगळवार) पार पडली. त्यामध्ये गुणवत्ता, गैरप्रकारांना रोखणे, विद्यार्थ्यांची सोय यावर चर्चा करुन परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. द्वितीय वर्ष ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 मार्च पासून सुरु होतील. तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 30 मार्च पासून होणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर केला जाणार आहे. परीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वेळा इशारा दिला जाईल, त्यानंतर परीक्षा आपोआप बंद होईल.

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ही परीक्षा महाविद्यालय स्तरावर ऑनलाइन घेतली अशी चर्चा होती. मात्र, विद्यार्थी आणि महाविद्यालयांची सोय लक्षात घेता परीक्षा वैयक्तिक मोबाइल घ्यावी की परीक्षा केंद्रावर याचा निर्णय उपसमिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल दोन ते तीन दिवसांत मिळणार आहे. अंतिम वर्षाच्या विद्यर्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी महाविद्यालयांच्या लॅबचा उपयोग केला जाईल. यासंदर्भात लवकरच परिपत्रक काढले जाईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

अशी असेल परीक्षा
पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्ष सोडून इतर सर्व वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने होणार आहे. ही परीक्षा 50 गुणांची व एका तासाची होणार आहे. तर अंतिम वर्ष हे महत्त्वाचे असल्याने या वर्षातील विद्यार्थ्याची परीक्षा 70 गुणांची व दीड तासाची होणार आहे. यामध्ये 50 गुणांचे एमसीक्यू प्रश्न असतील. यासाठी एक तासाचा कालावधी असेल. तर 20 गुणांची लेखी परीक्षेसाठी अर्ध्या तासाचा वेळ असेल. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी पाच पैकी चार प्रश्न सोडवावे लागतील. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 30 शब्दांच्या आत असणे आवश्यक आहे. प्रश्नाचे उत्तर लिहून ते स्कॅन करुन त्यानंतर त्याचा क्युआर कोड जनरेट करुन तो उत्तरपत्रिकेला जोडावा लागेल. क्युआर कोड कसा करायचा आणि तो अपलोड कसा करायचा याचे व्हिडीओ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.