‘ज्ञानोबा तुकाराम’च्या गजरात दुमदुमली तिरूपती, पुणे विद्यापीठाची सुवर्ण कामगिरी

तिरूपती : वृत्तसंस्था – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने तिरूपती विद्यापीठ येथे झालेल्या ‘राष्ट्रीय संस्कृत छात्रप्रातिभ’ समारोहामध्ये यावर्षी दोन पाऊल पुढे टाकत सोनेरी कामगीरी केली आहे. दोन सुवर्ण, एक सिल्वर व एका ब्रॉन्झ पदकासह विभागाने चार पदकांची कमाई केली.

राष्ट्रीय तिरूपती संस्कृत विद्यापीठ आयोजित ‘राष्ट्रीय संस्कृत छात्रप्रातिभ ‘स्पर्धेमध्ये यंदा देशातील 38 विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. मागच्या वर्षी या स्पर्धेत पुणे विद्यापीठाला वैयक्तिक गायन प्रकारात सुवर्ण मिळाले होते. तर एकांकिका स्पर्धेत ब्रांझ मेडल मिळाले होते. यंदा ‘चिंगी’ या मराठी एकांकीकेचे प्रा.निधी वढेरा यांनी संस्कृत भाषांतर केलेले ‘रमा’ ही एकांकीका सादर केली होती. या एकांकीकेला यंदा सुवर्ण पदक मिळाले. या एकांकीकेचे दिग्दर्शन समाधान वाडीकर याने केले होते. वैयक्तिक गायन प्रकारात मेडल कायम ठेवत मुक्ता जोशी हिने सलग दुसऱ्या वर्षी सुवर्ण पदक मिळवून विद्यापीठाचा बहूमान वाढविला. चिन्मय पुजारी याने भाषणामध्ये रूपेरी पदक मिळवले तर सामुहीक लोकनृत्य प्रकारात सादर केलेल्या ज्ञानोबा तुकारामच्या गजरात ‘वारकरी दिंडी व पावल्या’ला ब्रॉन्झ पदक मिळाले. राधा मेहता हिच्या मनोगताला प्रेक्षकांनी भरभरून दाद देत टाळ्यांचा वर्षाव केला. साक्षी निनगुरकर ,साध्वी मराठे ,श्रद्धा कुलकर्णी, अश्विनी वाघ, अमेय खरे, कृष्णा रामदासी, बालाजी पोटे, कल्याणी कुलकर्णी यांचा एकांकीका व लोकनृत्यामध्ये सहभाग होता.

प्रा. डॉ. दिनेश रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील संस्कृत व प्राकृत भाषा विभागातील बारा जणांचा संघ स्पर्धेकरिता 2 फेब्रुवरीला दाखल झाला होता. विजयानंतर विभाग प्रमुख डॉ. शैलजा कात्रे , संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र प्रमुख प्रा. रविंद्र मुळे, प्रा.डॉ. राजश्री मोहाडीकर, प्रा.देवनाथ त्रिपाठी, प्रा. मुग्धा गाडगीळ, प्रा. दिवाकर मोहंती यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर विद्यार्थ्यांनी विजयी संघाचे जल्लोषात स्वागत केले.