Pune Unlock 5.0 : हॉटेल्स, रेस्टॉरंट सोमवारपासून सुरू होणार ! ‘हे’ मात्र बंदच राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत महापालिकेनंही शहरातील हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट बार आदी येत्या सोमवारपासून (दि 5 ऑक्टोबर) 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्याचे आदेश गुरूवारी रात्री काढले आहेत. मात्र अद्यापही शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, प्रशिक्षण संस्था, जलतरण तलाव, मनोरंजक पार्क, नाट्यगृह सुरू करण्यास पूर्णत: बंदी असून शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत ते बंदच राहणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढलेल्या आदेशात शहरातील हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट बार आदी येत्या सोमवारपासून (दि 5 ऑक्टोबर) 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यात येतील असं नमूद केलं आहे.

केंद्र, राज्य आणि महापालिका प्रशासनानं वेळोवेळी परवानगी दिलेल्या आस्थापना यापूर्वी दिलेल्या सवलती नुसार सुरूच राहणार आहेत. तर प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व प्रतिबंध व नियम पूर्वीप्रमाणेच 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहेत.

सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी सुरक्षासंबंधीचे नियम पाळणं बंधनकारक राहणार आहे. मास्क, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण, गर्दी या संदर्भातील नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

सार्वजनिक सभा, संमेलनं, यांना बंदी कायम असून लग्न समारंभासाठी 50 आणि अंत्यविधीसाठी 20 लोकानांच परवानगी असणार आहे. शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, प्रशिक्षण संस्था, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह आदी बंदच राहणार असल्याचं पालिकेनं सांगितलं आहे.