Pune : हातात तलवारी अन् कोयते घेऊन वाहनांची तोडफोड अन् एकावर वार; चतुःश्रृंगी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कडक लॉकडाऊनच्या काळात रात्रीच्यावेळी दुचाकीवर हातात तलवारी अन कोयते घेऊन आलेल्या टोळक्याने एकावर वार केल्यानंतर वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवल्याचा प्रकार चतुशृंगी परिसरात घडला आहे.

याप्रकरणी ज्ञानेश्वर साठे (वय 55) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दूचाकीवरील 5 अनोळखी व्यक्ती व त्यांचे साथीदार यांच्यावर चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वडारवाडी येथील महालेनगर परिसरात राहतात. दरम्यान ते रात्री घरासमोर गप्पा मारत बसले होते. यावेळी अचानक दुचाकीवर टोळके आले. त्यांच्या हातात तलवारी आणि कोयते होते. त्यांनी परिसरात दहशत माजवत एका तरुणावर वार केले. त्यानंतर परिसरात लावण्यात आलेल्या वाहनांची तोडफोड करत प्रचंड गोंधळ घातला. तसेच, शिवीगाळ करून नागरिकांच्या मनात भिती भरवली. अधिक तपास उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे हे करत आहेत.