पुण्यातील एका गावाचा निर्णय, परिसरात खरेदी-विक्री करणार नाही चीनी वस्तू, जारी केले पत्रक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कोंढवे-धावडे ग्राम पंचायतीने प्रस्ताव मंजूर करून 1 जुलैपासून गावात चीनी वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर प्रतिबंध लागू केला आहे. ग्राम पंचायतीने याबाबत एक पत्रक जारी केले आहे, जे दुकानदार आणि ग्रामस्थांमध्ये वाटले जात आहे. यामध्ये म्हटले आहे की, गावातील कोणीही दुकानदार चीनी वस्तू ठेवणार नाही. तसेच गावातील कोणीही व्यक्ती चीनी वस्तू खेरदी करणार नाही. कोंढवे-धावडे गावचे सरपंच नितिन धावडे यांनी म्हटले की, हा निर्णय मासिक बैठकीत घेण्यात आला आहे.

सरपंचांनी सांगितले की, आम्ही ग्रामपंचायतीच्या ठेकेदारांना सुद्धा या निर्णयाबाबत सांगितले आहे. त्यांच्यासोबत कराराच्यावेळी सुद्धा चीनी उत्पादनांचा वापर न करण्याची अट ठेवली जाणार आहे. आम्ही दुकानदार आणि ग्रामस्थांनाही चीनी वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर प्रतिबंध लावण्यास सांगितले आहे. यासाठी आम्ही पोस्टर-बॅनरसुद्धा लावणार आहोत. पूर्व लडाखमध्ये एलएसीवर चीनच्या कृत्यामुळे देशभरात संताप दिसून येत आहे. नुकताच महाराष्ट्र सरकारने चीनच्या तीन कंपन्यांशी झालेला सुमारे 5,000 कोटी रूपयांच करार स्थगित ठेवण्याची घोषणा केली आहे.

काही दिवसांपूर्वी संघाने सुद्धा एका महत्वपूर्ण बैठकीत देशात चीन निर्मित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे अभियान सुरू केले आहे. यापूर्वी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच कॅटने चीनी वस्तुंवर बहिष्कार अभियानात मुख्यमंत्री आणि राजकीय पक्षांचे समर्थन मागितले होते. कॅटच्या ’भारतीय वस्तू-आमचा अभिमान’ या आवाहनावर क्रिकेटर हरभजन सिंहने सुद्धा कोणत्याही चीनी ब्रँडसाठी जाहिरात न करण्याची घोषणा केली होती. सरकारने सुद्धा चीनकडून आयात होणार्‍या काही वस्तूंवर अँटी-डंपिंग ड्यूटी लावली आहे.

भारतात चीनी वस्तूंना विरोध पाहून चीनने एक वेगळीच पद्धत अवलंबली आहे. चीन आता हाँगकाँगच्या मार्गाने भारतात आपले सामान पाठवत आहे. याच कारणामुळे यावर्षी मार्चमध्ये संपलेल्या या आर्थिक वर्षात चीनसोबतचा भारताचा व्यापार कमी झाला, परंतु हाँगकाँगसोबतचा भारताचा व्यापार वाढला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, आता वाणिज्य मंत्रालय हाँगकाँगसोबत वाढत्या व्यापाराचे पुनरावलोकन करणार आहे, जेणेकरून हाँगकाँग मार्गे येणार्‍या चीनी वस्तूंवर प्रतिबंध घालता येईल.