Pune : चोरीची कार वापरून शहरात विविध ठिकाणी घरफोडया करणार्‍याला विश्रामबाग पोलिसांकडून अटक, 9 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कारची चोरी करून त्याकारने विविध भागात घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे तपास केल्यानंतर 8 घरफोड्या व एक वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणले आहेत.

सर्फराज उर्फ रावण ताज शेख (वय 20, रा. भोसरी, मूळ. बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार विकास उर्फ जंगल्या कांबळे हा पसार होण्यात यशस्वी झाला आहे.

शहरात घरफोड्या आणि वाहन चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पण या घटना रोखण्यात यश येत नसल्याचे दिसत आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातो. पण ते सापडत नसून, त्यासाठी विशेषतः या घटना रोखण्यासाठी आणि त्यातील आरोपी पकडण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान बुधवार पेठेत एक दुकान फोडण्यात आले होते. गुन्ह्याचा तपास विश्रामबाग पोलीस करत होते. यावेळी तपासात चोरट्यांनी अल्टोकार वापरली असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी या कारचा प्रथम शोध घेतला. त्यावेळी ही कार चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल होता. मग पोलिसांनी आरोपींची माहिती घेण्यास सुरुवात केली. पिंपरी चिंचवडमधील 150 हुन अधिक सीसीटीव्ही तपासले. त्यात आरोपी हे या भागातले असल्याचे दिसून आले. त्यानुसार आठ दिवस फिरुन पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. त्यावेळी संततुकाराम नगर येथे कार दिसताच पोलिसांनी थांबविले. मात्र पोलिसांना पाहून दोघे कारसोडून पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून सर्फराज याला पकडले. पण त्याचा साथीदार पसार झाला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कार चोरून त्याद्वारे शहरात घरफोड्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडून 8 घरफोड्या आणि एक वाहन चोरी असे 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या यासह 50 हुन अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई परिमंडळ एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे, वरिष्ठ निरीक्षक दादासाहेब चुडप्पा, उपनिरीक्षक विजय जाधव, शरद वाकसे, बाबासाहेब दांगडे, विठ्ठल खिलारे यांच्या पथकाने केली आहे.