UPSC 2019 Result : जिद्दीला सलाम ! अंधत्वावर मात करत पुण्यातील जयंत मंकले देशात 143 वा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – यूपीएससी 2019 च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये प्रदीप सिंह देशात पहिला आला आहे. UPSC civiel Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून 829 महत्वाकांक्षी युवक युवती निवडले गेले आहेत. जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राची नेहा भोसले ही देशात पंधराव्या रँकवर आहे. तर अभिषेक सराफ आठव्या रँकवर आहे. परंतु यामध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे ते पुण्यातील जयंत मंकालेनं. पुण्यातील जयंत मंकाले याने अंध विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत 143 वा क्रमांक पटकावला आहे.

यापूर्वी जयंत याने 2018 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र, त्यावेळी त्याचा 937 वा क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी दोन वर्षे अथक परिश्रम घेऊन पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांना यश आले. 2018 मध्ये यश न मिळाल्याने एक वर्ष जयंत नैराश्येतही होता, मात्र अभ्यास करून जिद्दीनं त्याने 143 वा क्रमांक पटकावला. जयंत याने संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयातून 2013 मध्ये पहिल्या श्रेणीत मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तळेगाव दाभाडे व भोसरी येथे दोन वर्षे मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून नोकरी केली. या कालावधीत त्याला रेटिना पिग्मेन्टोसा हा असाध्य आजार जडला. त्यामुळे जयंतची दृष्टी कमी होत गेली.

सुरुवातीपासूनच लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले होते. मात्र, आयईएस मध्ये दिव्यांगांना प्रवेश नसल्याने जयंतने शिक्षणाचा उपयोग व्हावा यासाठी युपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.2015 पासून जयंतने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2017 मध्ये मुलाखतीपर्यंत तो पोहचला. मात्र, त्याची निवड झाली नाही. अखेर यंदाच्यावर्षी जयंत 143 वा रँक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली. अंधत्वावर मात करून जयंत याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.