Pune : ‘Vodafone-Idea’ मोबाईल सेवा मध्यरात्रीपासून ठप्प, लाखो ग्राहक ‘हवालदिल’ !, पावसामुळे तांत्रिक बिघाड – कंपनीचा दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्होडाफोन आणि आयडिया या दोन मोबाईल कंपन्यांच्या मागील शुक्लकाष्ठ अद्याप संपलेले नाही. या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन ‘व्ही’ ही कंपनी स्थापन केली. पण मध्यरात्री पावसात ‘ व्ही’ ची यंत्रणा कोलमडून पडल्याने लाखो ग्राहकांना त्याचा फटका बसला . संतप्त ग्राहकांनी ठिकठिकाणी व्ही च्या स्टोअर बाहेर गर्दी केल्याने कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रात्री झालेल्या पावसाचे पाणी कल्याणीनगर येथील कंपनीच्या सर्व्हरमध्ये गेल्याने यंत्रणेत बिघाड झाल्याने सेवा बंद पडली आहे. राज्यात अनेक ठिकाणी हा प्रॉब्लेम आल्याने सेवेवर परिणाम झाला आहे. यंत्रणेत दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दुपार पर्यंत सेवा सुरळीत होईल असे मुख्य कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती ‘व्ही’ कंपनीच्या हिराबाग येथील कार्यालयातील अधिकारी श्रीमती वीणा यांनी दिली.

दरम्यान, रात्री शहरात मुसळधार पाऊस झाला. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ‘ व्ही ‘ कंपनीची मोबाईल सेवा खंडित झाली. अगदी सकाळी देखील रेंज येत नसल्याने पावसामुळे टॉवर ला प्रॉब्लेम आला असावा या शंकेने ग्राहकांना ग्रासले. परंतु शहरात कुठेही गेले तरी रेंज येत नसल्याने अनेकांनी ‘ व्ही ‘ च्या स्थानिक स्टोअर कडे कूच केली. हिराबाग येथील कंपनीच्या कार्यलयासमोर काही वेळातच दीडशे ते दोनशे ग्राहक जमले होते.

या ग्रहाकानी प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्याने वातावरण अधिकच गंभीर झाले होते. पेशंट रुग्णालयात आहेत , महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू आहेत, शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत, होम डिलिव्हरी पोहोचवायच्या आहेत अशा एक ना अनेक तक्रारींमुळे वातावरण अधिकच गंभीर झाले होते. अखेर खडक पोलिसांना तेथे पाचारण करण्यात आले. स्वतः पोलीस निरीक्षक सय्यद यांच्यासह पोलीस कर्मचारी तेथे आल्यांनातर त्यांनीही नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण काहीसे निवळले.

दरम्यान, मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना कुठल्याही परिस्थितीत एक तासाहून अधिक काळ सेवा बंद ठेवता येत नाही. अशा परिस्थितीत व्ही कंपनीने तातडीने सेवा सुरू करण्यासाठी कोणता बी प्लॅन आखला आहे, याची माहिती द्यावी अन्यथा रीतसर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आरपीआय चे नेते मंदार जोशी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.