वाघोलीत संपन्न झाला विशाल निरंकारी संत समागम

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन – संत निरंकारी मिशनच्या प्रमुख, सदगुरु सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात महालक्ष्मी लॉन्स, वाघोली येथे नुकताच विशाल निरंकारी संत समागम संपन्न झाला. या संत समागमामध्ये संपूर्ण पुणे जिल्हा आणि आजुबाजुच्या जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने निरंकारी भक्तगण उपस्थित होते.

सदगुरु सुदीक्षाजी महाराज यांनी आपल्या प्रवचनामध्ये समजावले की, ज्या परमात्म्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्या परमात्म्याची ओळख करणे हे मनुष्य जन्माचे आद्य कर्तव्य आहे. परमात्म्याची ओळख केल्यानंतरच मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेम, दया, करुणा, नम्रता यांसारखे दैवी गुण येतात. मनुष्य जन्म हा अनमोल आहे परंतु क्षणभंगुर सुद्धा आहे त्यामुळे मनुष्याने निराकार परमात्म्याची ओळख करून घेतली पाहिजे.

या समागमाद्वारे आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून जगामध्ये मानवता, विश्वबंधुत्व आणि शांतीसुखाचे वातावरण स्थापित करणारा मिशनचा सत्य, प्रेम व एकात्मतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. संत समागमामध्ये मिशनमधील विद्वान वक्ते यांनी आपले अनुभवसंपन्न विचार, भक्तीरचना आणि कवितांच्या माध्यमातून आपले भाव व्यक्त केले.