Pune : ह़डपसर स्मशानभूमीतही अंत्यविधीसाठी ‘वेटिंग’

पुणे – बाप रे… आतापर्यंत हडपसरमध्ये कोरोनाची लस मिळत नाही, बेड, व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभागामध्ये खासगी रुग्णालयामध्ये जागा शिल्लक नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना बेडसाठी वेटिंगवर थांबावे लागत आहे. उपचारासाठी वेटिंग इथपर्यंत ठीक होते आता अंत्यविधीसाठी वेटिंगवर थांबावे लागत आहे, ही बाब अत्यंत दुःखदायक आहे. डिझेल दाहिनी बंद असल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ लागली आहे. आता तरी हडपसरवासियांनो सावधानता बाळगा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. हडपसर अमरधान स्मशानभूमीमध्ये सहा शेड आहेत. मात्र, दररोज 14 ते 16 मृतांवर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने इतरांवर बाहेरच्या मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार केले जात असल्याचे येथील कर्मचारी राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

hadapsar-smashanbhumi
file photo

हडपसरमधील अमरधान स्मशानभूमीमध्ये मागिल तीन दिवसांपासून विद्युत दाहिनी बंद असल्याने अंत्यविधीसाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे जमिनीवर अंत्यविधी केले जात आहेत. विकेंडच्या दोन दिवस कडक निर्बंधानंतर बुधवारपासून (दि.15 ते 30 एप्रिल) राज्यभर कडक निर्बंध जारी केले आहेत. मात्र, कडक निर्बंधांमधून अत्यावश्यक सेवा वगळल्यामुळे त्याचा गैरफायदा घेत नागरिक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे गर्दी होत आहे, त्यातून कोरोनाची ब्रेक द चैन तुटण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता तरी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोरोनाला हरवणे आपल्या हातात आहे, शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत, त्याला प्रतिसाद देणे आपली जबाबदारी आहे. कोरोनाचा उद्रेक वाढला तर भयानक स्थिती निर्माण होईल. त्यामुळे आता आपणच कोरोनाला हरवू या, अशी शपथ घेऊन घरामध्येच थांबा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मिनाझ मेमन, मयुरी बामणे, बापू जगताप, राजाभाऊ होले, अ‍ॅड. व्ही. व्ही. बोरकर, शैलेंद्र बेल्हेकर, मुकेश वाडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारविजेते बच्चूसिंग टाक म्हणाले की, आज दिवसभरात 14 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी अवघ्या सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतील एवढी क्षमता आहे. मात्र, कोरोनामुळे मृतांमध्ये वाढत होत असल्याने दररोज 15 ते 16 मृतांवर संस्कार करावे लागत असल्याने शेडची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी उभारलेल्या शेडच्या बाहेर मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे, त्यामुळे नागरिकांनी आता सावधानता बाळगणे ही काळाची गरज आहे. डिझेल दाहिनी लवकरच सुरू होईल, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे उपनेते महेंद्र बनकर म्हणाले की, हडपसर अमरधाम स्मशानभूमीमध्ये सहा मृतांवर अंत्यविधी करता येतात. मात्र, मृतांची संख्या जास्त असल्याने आता अंत्यविदीच्या शेडबाहेर मृतांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. डिझेल दाहिनी बंद असल्याने कोरोनाच्या मतांवरदेखील बाहेरच अंत्यविधी केले जात आहेत. महापालिका प्रशासनाने तातडीने जम्बो कोविड केंद्र सुरू करून कोरोनाबाधितांना तातडीने उपचार द्यावेत. मागिल महिन्यापासून कोरोनाबाधितांना उपचारासाठी वणवण भटकावे लागत आहे. रेमडिसिवर इंजेक्शन मिळत नाही. कोविडची लस मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. प्रशासनाने आता हडपसरवासियांचा अंत न पाहता तातडीने जिथे जागा योग्य वाटेल त्या ठिकाणी कोविड केंद्र सुरू करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.