Pune : इंदिरा कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये चोरी, नळाचे 115 कॉक चोरट्यांनी पळवले

पुणे : लॉकडाऊननंतर शहरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून चोरट्यांनी मिळेल ते चोरून नेण्याचा सपाटा लावला आहे. अशाच प्रकारची चोरी वाकडच्या इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूटच्या ताथवडे येथील अक्षरा हॉस्टेलमध्ये झाली आहे. चोरट्यांनी हॉस्टेलमधून दोन प्रकारचे 115 नळाचे कॉक चोरून नेले आहेत.

लॉकडाऊनपासून विद्यार्थी आपआपल्या गावी गेल्याने पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्याप्रमाणात असलेले हॉस्टेल बंद आहेत. चोरट्यांनी याचा फायदा घेत ही चोरी केली आहे. या चोरीची फिर्याद मधूनकर हनमंत जाधव (वय 54, रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांनी दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीचा प्रकार 28 ते 30 ऑगस्ट 2020 कालावधीत घडला आहे. इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूटचे ताथवडे येथील अक्षरा हॉस्टल कुलूप बंद असल्याने चोरट्यांनी मागील ग्रीलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी 8 हजार 800 रूपये किंमतीचे 44 अँगल कॉक आणि 7 हजार 100 रूपये किंमतीचे 71 बीब कॉब असे एकुण 15 हजार 900 रूपयांचे कॉक चोरून नेले. तसेच चोरट्यांनी हॉस्टलेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे सामानही अस्ताव्यस्त करून लॉकर तोडले आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.