वालचंदनगर : WhatsApp Group च्या माध्यमातून सहज ‘संवाद’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील तरुणाने एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून राज्यातील विविध पदांवर कार्यरत असलेले अधिकारी, राजकीय पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविणाऱ्या लोकांना एकत्र आणून सामाजिक कार्यात मोठा हातभार लावला आहे. या ग्रुपला पाच वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल घेतलेला आढावा.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वालचंदनगर येथील अमोल राजपूत याला वालचंदनगर कंपनी मध्ये काम करत असताना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. या आवडीमुळे त्याने पत्रकारिता क्षेत्रात आपले काम हिरीरीने सुरू केले. तरीही सामाजिक कार्य अजूनही कमीच पडत असल्याचा भावनेतून त्याला एक कल्पना सुचली आणि ती त्याने सत्यात उतरवली. ‘खबर सबसे तेज वालचंदनगर’ या नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला. यामध्ये समाजातील सर्वच प्रतिष्ठित तसेच तळागाळात काम करणाऱ्या लोकांना एकत्र आणण्याचा छोटासा प्रयत्न केला आणि त्याला यात चांगलेच यश मिळाले.

या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांचा योग्य समन्वय घडवून आणला. त्याच बरोबीने ग्रुपमधील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबविणे हा जणू छंदच लागला. या ग्रुपला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या पाच वर्षात वालचंदनगर परिसरामध्ये या ग्रुपने चांगलेच नाव कमावले आहे. एवढेच काय पण इंदापूर तालुक्याच्या महाराष्ट्र बाहेरील देखील अनेक वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी या ग्रुपमधून बाहेर न पडता या ग्रुपच्या कार्याला हातभारच लावतात आणि ग्रुपचे कौतुक केल्याशिवाय त्यांनाही राहवत नाही.

या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला पाच वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ग्रुपचे सदस्य असलेले पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा स्वामी समर्थांची प्रतिमा व शाल देऊन ग्रुपचे अ‍ॅडमिन अमोल राजपूत, तसेच ग्रुपचे सदस्य असलेले पत्रकार संतोष दहिदुले, इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संदीप सुतार, पत्रकार सत्याजित रणवरे, वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, त्रिवेणी ऑईल मिल अँड फुड्सच्या संचालिका शुभांगी मुंडे-चौधर, वालचंदनगर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अमरसिंह निंबाळकर, पोलीसमित्र संतोष कांबळे, व्यापारी विजय कांबळे आदींनी सन्मान केला.