Pune : पाणी मिळत नाही, नगरसेवकांनी मांडले गाऱ्हाणे

पुणे – पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करून देखील पुरेसे पाणी मिळत नाही. पाणी सोडणारे सभासदांना उलट उत्तरे देतात. अधिकारी फोन उचलत नाहीत, सत्ताधारी असतानाही अशा अडचणी असतील तर दाद मागायची कोणाकडे ? असा प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्षाच्या सभासदांनी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला.

शहरातील विविध भागात पाण्याची समस्या सोडविण्यात यावी, यासाठी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी पालिकेत एक बैठक झाली. या बैठकीत नगरसेवकांनी प्रभागात पाणी पुरवठ्याबद्दल येत असलेल्या अडचणी सांगितल्या. नगरसेविका राणी भोसले, रुपाली धाडवे, वर्षा साठे, रघू गौडा, प्रकाश ढोरे, योगेश समेळ पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप, मनीषा शेकटकर यांच्यासह पाणी पुरवठा विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून अपर इंदिरानगर, धनकवडी, इंदिरानगर, पर्वतीगाव, कसबा पेठ, खडकी, जुना पुणे मुंबई रस्ता, या परिसरातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत असून पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याकडे यासाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील केवळ दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. पालिकेत सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप काम करत आहे. सत्ताधारी असतानाही आम्हाला पाणी मिळत नसेल तर काय उपयोग? पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की एक दिवस सुरळीत पाणी मिळते, पुन्हा दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी मिळते. भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभागात जाणीपूर्वक पाणीपुरवठा कमी दाबाने होतो की काय? अशी शंका यावेळी सभासदांकडून व्यक्त करण्यात आली. या सर्व सभासदांनी उपस्थित केलेल्या शंकाचे समाधान करून पुढील चार ते पाच दिवसात पाण्याच्या सर्व समस्या सोडवाव्यात अशा सूचना सभागृह नेते बिडकर यांनी दिल्या.

शहरातील सर्व भागांना आवश्यक तो पाणीपुरवठा झालाच पाहिजे. प्रशासनाने त्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. काही भागातील पाणी सोडणारे (व्हॉल्व मन) मनमानी करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका