Pune : ‘आमचा संपूर्ण लॉकडाऊनला पाठिंबा, पण…’, पुणे व्यापारी महासंघाने केले स्पष्ट; रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर घेतला महत्वपूर्ण निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य सेवेवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे पुणे शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून इतर दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला पुणे व्यापारी महासंघाने विरोध करुन आज (सोमवार) पासून दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काल (रविवार) रात्री विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर आज दुकाने उघडण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला असल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले. मात्र, हा निर्णय केवळ आजच्या पुरता मर्यादीत असेल असेही रांका यांनी सांगितले. रांका यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून ही माहिती दिली.

फत्तेचंद रांका यांनी सांगितले की, रविवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया, प्रकाश ओसवाल, मनोज सारडा, राहुल हजारे, यशस्वी पटेल, नितीन पोरवाल, शंकर पटेल, बॉबी मैनी, संदीपसिंग नारंग, प्रमोद शहा आणि इतर पदाधिकारी-सदस्य उपस्थित होते.

व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे – सौरभ राव

व्यापाऱ्यांसोबत झालेल्या दोन तासांच्या बैठकीत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींना पुण्यातील कोरोनाची सध्य स्थिती आकडेवारीसह सांगितली. तसेच वाढत्या कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर कसा ताण पडत आहे याची माहिती करुन देत व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच 15 ते 30 या कालावधीमध्ये कोरोनाचा पिक अवर असल्याने या कालावधीत रुग्ण संख्या वाढू शकते असे सांगितले.

ग्राहक एका दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये फिरत असल्याने संक्रमण वाढण्याची शक्यात जात आहे. याच पद्धतीने पुण्यात संक्रमण वाढत आहे. मात्र, सध्या दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संक्रमण होताना दिसत नसल्याचे सौरभ राव यांनी सांगितले. पुण्याची परिस्थिती पाहता आणखी एक -दोन दिवस दुकाने उघडण्याचा निर्णय घेऊ नका. मुख्यमंत्री जे काय निर्णय घेतात त्याप्रमाणे आपण निर्णय घ्यावा, अशी विनंती सौरभ राव यांनी व्यापाऱ्यांना केली.

संपूर्ण लॉकडाऊनला पाठिंबा

फत्तेचंद रांका यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडताना सांगितले की, व्यापाऱ्यांमुळे संक्रमण वाढत आहे हे कुठेही सिद्ध झालेले नाही. तसेच कारखाने, ट्रान्सपोर्ट, रिक्षा, खाद्य पदार्थांचे स्टॉल, ई-कॉमर्सचे व्यवसाय सुरु ठेवणार असाल तर त्याला आमचा विरोध आहे. जर संपूर्ण लॉकडाऊन केले तर पुणे व्यापारी महासंघ पाठिंबा देईल. जर तुम्ही अंशत: लॉकडाऊन करुन आमचा व्यापार जर बंद करणार असाल आणि ई-कॉमर्स व्यवसाय सुरु ठेवणार असाल तर आमचा तिव्र विरोध राहील, आणि आमची दुकाने उघडू असा इशारा यावेळी देण्यात आला.

काही व्यापारी दुकान उघडण्यावर ठाम

यानंतर 46 व्यापारी असोसिएशसोबत झालेल्या झूम मिटींगमध्ये काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याच्या निर्णयावर ठाम होते. 46 असोसिएशनपैकी 9 जणांनी आपली मते मांडली. त्यांनी दुकाने उघडू नयेत असे मत मांडले. तर 30 असोसिएशनने दुकाने उघडण्याचा आग्रह धरला. मात्र, पुण्याची परिस्थिती पाहता आणि अधिकाऱ्यांन केलेली विनंती आणि 9 असोसिएशनने मांडलेले मते यामुळे काही निर्णय होऊ शकला नाही.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर पुढील रणनिती ठरवणार

आज व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी सांगितले की, अध्यक्ष या नात्याने आज आपण दुकाने उघडण्याचा जो निर्णय घेतला होता तो एक दिवसांपूरता स्थगित करत आहे. आज मुख्यमंत्री काय निर्णय घेतात यावर आपण पुढील रणनिती आखणार आहोत. जर कुणाला दुकाने उघडायची असतील तर त्या व्यापाऱ्याने आपल्या जबाबदारीवर दुकान उघडावे. जर त्याच्यावर कोणती कारवाई झाली तर त्याला व्यापारी महासंघ जबाबदार राहणार नाही, असे फतेचंद रांका यांनी सांगितले.