Pune : कष्टकर्‍यांना फसविणार्‍यांचा पर्दाफाश करणार – धनराज गवळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शेतीभाती नाही, घरदार नाही म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भटकणाऱ्यांना ठेकेदार शहरात घेऊन येतात. बांधकामावर किंवा रस्त्याच्या कामासाठी त्यांचा वापर करतात. मात्र, कोरोनामुळे कामे ठप्प झाल्याने ठेकेदाराने मिरजगाव (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथील सहा नागरिकांना रस्त्यावर सोडून दिले आहे. या वर्गाची फसवणूक स्वतःची पोळी भाजणाऱ्या ठेकेदाराचा तपास करून त्यांना कठोर शासन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे मत आधार फाउंडेशनचे अध्यक्ष, भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सचिव धनराज गवळी यांनी व्यक्त केले.

सोलापूर रस्त्यावर आकाशवाणीसमोर सायंकाळी सहाच्या सुमारास एकनाथ साळुंके (रा. मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांच्यासह दोन पुरुष, तीन महिला सात लहान लेकरांसह कोणी तरी खायला देईल या आशेने थांबले होते. अंधार पडत होता, मात्र, त्यांच्या मदतीसाठी कोणीही येत नव्हते. सातच्या सुमारास गवळी या कुटुंबाची केविलवाणी अवस्था पाहिली. त्यांनी चौकशी केली आणि तातडीने किराणा मालाच्या दुकानाकडे धाव घेत आटा, तांदूळ, मिरची, मीठ, तूरडाळ, मूगडाळ, मसाला, पोहे, साखर, चहा पावडर, तेल, लहान लेकरांसाठी डोक्याचे तेल आणि पारले बिस्कीट मोठे पॅकेट असे सुमारे दीड हजार रुपयांचे साहित्य खरेदी करून त्यांना दिले. गवळी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या गावापर्यंत सुखरूप पोहोचविण्याची व्यवस्था करतो, असे आश्वासन दिले. यावेळी आकाशवाणी येथील नीता उरसळ (विशेष पोलीस अधिकारी) यांनीही तांदूळ देऊन छोटीशी मदत केली.

गवळी म्हणाले की, ग्रामीण भागातील असह्य कष्टकऱ्यांना ठेकेदार शहरामध्ये काम देतो असे सांगून आणतात. काम झाले की, रस्त्यावर सोडून देतात, ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घातला पाहिजे. अन्यथा सामान्य नागरिकांना जगणेही असह्य होऊन जाईल. पोलिसांच्या मदतीने संबंधित ठेकेदाराचा तपास करून त्याच्याकडून या मजुरांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.