ACP दीपक हुंबरे यांचा रिपोर्ट ‘डीजी’ ऑफिसला पाठविणार : पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम  

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एसीपी दीपक हुंबरे यांच्याविरुद्ध सातारा येथे खंडणीचा गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांच्याविरुद्धचा रिपोर्ट पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात येत असून त्यानंतर तेथून आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले.
पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत असलेले व सध्या सक्तीच्या रजेवर असलेले सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा मंगळवारी रात्री दाखल झाल्याचे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविषयी पुणे शहरात अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्यांची बदली कार्यकारी पदावरुन विशेष शाखेत केली होती. मात्र, तेथेही ते लोकांचा घोळका जमवून बसत असल्याचे आढळून आले होते. त्याबाबतही तक्रारी येऊ लागल्याने कोरोना विषाणुच्या काळात पोलीस अधिकार्‍यांची अधिक गरज असताना पोलीस आयुक्तांनी त्यांना शिक्षा म्हणून सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.

सक्तीच्या रजेवर असताना त्यांचे उद्योग थांबले नाही. त्यातून गोळीबार प्रकरणातील तरुणाला अटक होऊ नये, यासाठी त्यांनी ५० हजार रुपयांची खंडणी मागून त्यापैकी ४० हजार रुपये स्वीकारले. त्यावरुन सातारा येथील भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.