Pune : येत्या काही दिवसांत शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न सोडवू : मनपा आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात मागील काही दिवसांपासून साचलेला कचरा उचलण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेने पुणे कँटाेन्मेंट बोर्डच्या प्रक्रिया प्रकल्पामध्ये १०० टन कचर्‍यावर प्रक्रिया सुरू केली असून, रामटेकडी येथील प्रक्रिया प्रकल्पातही कचर्‍यावर प्रक्रिया लवकरच सुरू होईल. तसेच देवाची उरुळी येथील कचरा डेपोमध्ये लँडफिल साइडवर आजपासून रिजेक्ट पाठविण्यास सुरुवात केल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

देवाची उरुळी येथील बायोमायनिंग प्रकल्पामध्ये मिश्र कचर्‍यावर प्रक्रियेस स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच अन्य प्रकल्पांतील रिजेक्ट डंपिंग करण्यासही विरोध केला आहे. अशातच हडपसर येथील रोकेम प्रक्रिया प्रकल्पामध्ये आग लागल्याने आणि आंबेगाव येथील नव्यानेच उभारलेल्या प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करणार्‍या आंदोलकांनी आग लावल्याने शहरातील कचरा प्रश्‍न गंभीर झाला आहे. मागील १०० दिवसांपासून शहरात दररोज ४०० टन कचर्‍याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग दिसत आहेत. तसेच अनेक ठिकाणी एकदिवसाआड कचरा उचलण्यात येत आहे. ऑक्टोबरमध्ये ऐन पावसाळ्यात या कचर्‍यामुळे शहरातील नाले आणि पावसाळी गटारांना अडथळा होऊन रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. तसेच मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की देवाची उरुळी येथील ग्रामस्थांशी चर्चा करून कचरा डेपो व परिसरातील प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. शहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी पुणे कँटाेन्मेंट बोर्डच्या एका प्रकल्पामध्ये १०० टन कचर्‍यावर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरातील अन्य प्रकल्पांवर साधारण दररोज १५० टन रिजेक्ट निर्माण होते. हे रिजेक्ट उचलण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. देवाची उरुळी येथील कचरा डेपोतील लँडफिल साइडवर हे रिजेक्ट टाकण्यात येत आहे.

यासोबतच हडपसर येथील दिशा प्रकल्पाच्या आवारात नवीन मशिनरी बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मध्यंतरीच्या काळात या प्रकल्पाच्या आवारात साठविण्यात आलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यालाही लवकरच गती देण्यात येईल. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरातील कचरा पूर्णत: उचलला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

कचरा प्रक्रिया प्रकल्पांची माहिती देण्याचे आदेश – हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती
स्थायी समितीच्या आज (मंगळवार) झालेल्या बैठकीमध्ये प्रशासनाकडून कचर्‍याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. मागील दहा वर्षांमध्ये महापालिकेने किती प्रकल्प सुरू केले आहेत. चालू व बंद स्थितीतील प्रकल्पांची माहिती ? त्यांची क्षमता किती? दररोज किती कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते? हे प्रकल्प किती कालावधीसाठी चालविण्यास देण्यात आले आहेत? यावर महापालिकेने आतापर्यंत किती खर्च केला आहे? भविष्यात किती खर्च होणार? असे एकत्रित ऑडिट देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुढील सहा महिन्यांत सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू करून शहरातील कचर्‍याची समस्या कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न राहातील, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.