Pune : महापालिका प्रशासन पावसाळापूर्व कामे कधी करणार – शिवसेना उपविभागप्रमुख महेंद्र बनकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  नेमेचि येतो पावसाळा… पहिल्याच पावसात ओढे-नाले, पावसाळी आणि मल वाहिन्या स्वच्छ केल्या नसल्याने तुंबतात आणि पावसाचे नागरिकांच्या घरात पाणी शिरते, हा प्रकार नवीन नाही. पावसाळापूर्व कामे पालिका प्रशासनाकडे विचारणा केली, तर ही कामे मुख्य बिल्डिंकडे आहेत, असे सांगून जबाबदारी झटली जात आहे. तर मुख्य बिल्डिंगमधील अभियंते पावसाळापूर्व कामे केली असून, त्याचे फोटो दाखवत आहेत. प्रत्यक्षात हडपसर परिसरातील पावसाळापूर्व कामे झाली नाही. त्यामुळे पावसाळापूर्व कामे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानंतर करणार का, असा संतप्त सवाल हडपसर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उपविभागप्रमुख महेंद्र बनकर यांनी उपस्थित केला.

शिवसेना उपविभागप्रमुख बनकर यांनी शिवसेनेच्या वतीने हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त यांना पावसाळापूर्व कामे तातडीने करावीत, असे निवेदन दिले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख, उपशहरप्रमुख समीर तुपे, हडपसर विभागप्रमुख प्रशांत पोमण उपस्थित होते.

बनकर म्हणाले की, ससाणेनगर, हडपसर गाव, काळे बोराटेनगर परिसरातील सांडपाण्याच्या वाहिन्या, हडपसर भाजीमंडईतील पावसाळी गटारे, ससाणेनगर रेल्वे गेट ते नवीन कालव्यालगतच्या पांढरे मळा या मुख्य रस्त्यावरील सांडपाण्याच्या आणि पावसाळी वाहिन्या, हडपसर गावठाणातील ससाणेआळी, मगरआळी, रामोशीआळी, फुलारेआळी, शिंपीआळी, डांगमाळीआळी, आल्हाट वस्ती, पुणे-सोलापूर महामार्गावरील मगरपट्टा चौक, रवीदर्शन चौक येथील मलवाहिन्या आणि पावसाळी वाहिन्यांसह ओढ्या-नाले स्वच्छ केले नाहीत. त्यामुळे पहिल्याच पावसात पाण्याचा लोंढ्याबरोबर झाडपाला, कचरा, माती वाहून येते. मात्र, नाल्याची स्वच्छता न केल्यामुळे नाले तुंबून सखल भागातील नागरी वस्तीसह रस्त्यावर पाणी साचण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने कागदीघोडे नाचवून काम केल्याचे सांगण्याऐवजी घटनास्थळी नागरिकांसमवेत पाहणी करून खात्री करावी. पावसाचे पाणी साचून नागरीवस्तीमध्ये शिरले आणि पुणे-सोलापूर रस्त्यासह हडपसरमधील अंतर्गत रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली, तर त्याला पालिका प्रशासनाला अधिकारी-कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी सांगितले. वाहिन्यांसह ओढे-नाले तातडीने स्वच्छ करणे अपेक्षित आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप पावसाळापूर्व कामे झाली नाहीत. प्रशासनाने आता तरी झोपडपट्टी, बैठ्या चाळींसह सोसायट्यांमधील चेंबर, पावसाळी वाहिन्यांची कामे करण्यासाठी तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, महापालिकेचे डेप्युटी इंजिनिअर प्रकाश पवार यांनी सांगितले की, हडपसर परिसरातील मलवाहिनी, सांडपाणी आणि पावसाळी वाहिन्या स्वच्छ करण्याचे काम सुरू असून, ओढ्या-नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. नागरिकांनी पावसाळापूर्व कामे सांगितली तरी ती केली जातात. पावसाचे पाणी साचणार नाही किंवा नागरिकांच्या घरामध्ये शिरणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.