Pune : Remdesivir इंजेक्शनचा वापर योग्य पद्धतीने होतो की नाही? महापालिका भरारी पथकाची स्थापना करणार – डॉ. संजीव वावरे (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी राज्य शासनाने दिलेल्या गाईडलाईन नुसार रेमडिसिविर इंजेक्शनचा वापर होत नसल्याबाबत सांशकता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये रेमडिसिविर वापराबाबतची तपासणी करण्यासाठी भरारी पथक नेमण्यात येणार आहेत. या पाहाणीत रेमडिसिविरचा आयोग्य वापर होत असल्यास संबधित रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

मागील दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात ५० हजार ऍक्टीव्ह रुग्ण असून जवळपास सात हजार रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. ज्या कोरोना बाधित रुग्णांची ऑक्सीजन लेव्हल कमी झाली आणि एचआरसीटी स्कोर कमी झाला आहे, त्यांना रेमडिसिविर इंजेक्शनचे पाच डोस देण्यात येतात. महापालिकेसोबतच बहुतांश खाजगी रुग्णालयांना रेमडिसिविर इंजेक्शन पुरवठा करण्यात येतो. मात्र, सध्या खाजगी रुग्णालयांकडून मोठ्याप्रमाणावर रेमडिसिविरची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्या तुलनेते या इंजेक्शनचा पुरवठा कमी होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव होत आहे. अनेक मेडीकल्स बाहेर रांगा लागू लागल्या आहेत. यानंतरही इंजेक्शन मिळतील याची शाश्‍वती नाही, अशी परिस्थिती आहे. अशातच अनेक ठिकाणांहून या महागड्या इंजेक्शनचा काळाबाजार होत असून रुग्णांची प्रकृती चांगली असतानाही इंजेक्शन मागविली जात असल्याने मनस्ताप होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर खाजगी रुग्णालयांमध्ये राज्य शासनाच्या गाईडलाईन्सनुसार इंजेक्शनचा वापर होतो की नाही याची तपासणी करण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शक्यतो ऑक्सीजन लेव्हल कमी झालेल्या आणि रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णाला पहिल्या आठवड्यातच हे इंजेक्शन लागू पडते. एचआरसीटी स्कोर साधारण १० पेक्षा पुढे गेल्यानंतर हे इंजेक्शन वापरावे असे नॉर्म्स आहेत. आठ दिवसांनंतरही गंभीर अवस्थेत गेलेल्या रुग्णांना या इंजेक्शनची मात्रा लागू पडत नाही. परंतू काही ठिकाणी एचआरसीटी स्कोर तीन पर्यंत असेल तरी इंजेक्शन मागविली जातात. रुग्ण दाखल झाल्यानंतर अवघ्या एक दोन दिवसांनीही ही इंजेक्शन दिली जात असल्याच्या तक्रारी आहे. यामुळेच महापालिकेने भरारी पथकाच्या माध्यमातून रेमडिसिविरचा योग्य वापर होतो की नाही याची तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. संजीव वावरे यांनी नमूद केले.