Pune : पती-पत्नीच्या घरघुती वादानंतर महिलेनं गाठलं पोलिस स्टेशन, नवर्‍याची चौकशी करताना हबकले पोलिस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पती-पत्नीचा घरघुती कारणावरून वाद झाल्यानंतर पत्नीने पोलीस ठाणे गाठले अन् पतीची तक्रार दिली. पोलिसांनी पतीला बोलवत चौकशी केल्यानंतर दुसरीच माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याच्याकडून दोन पिस्तूल व 6 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
बाळासाहेब उमाजी मदने (रा. चौधरी वस्ती) व सुग्रीव अंकुश भंडलकर (रा. चंदननगर) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब याच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनुसार पोलीस तपास करीत असताना तिच्या पतीकडे पिस्तुलासह सहा काडतुसे मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली. चौकशीत त्याने बारामतीतील खांडज गावातील सुग्रीव भंडलकर याच्याकडून ४० हजारांना पिस्तूल विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुग्रीवला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बारामती शहर, बारामती तालुका, भिगवण, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, दरोडा घातल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून २ पिस्तूल १० काडतुसे जप्त करण्यात आली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन जाधव, युसूफ पठाण, रोहिदास लवांडे, श्रीकांत शेडे, अमित कांबळे यांच्या पथकाने केली.