पुण्यात 24 तासांत विलगीकरणाचे 300 बेड, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाला असून अवघ्या चोवीस तासांच्या आताच विलगीकरणाचे ३०० बेड्स सज्ज करण्यात आले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नायडू सांसर्गिक रुग्णालयात सुरुवातीला विलगीकरणाचे ६ बेड्स उपलब्ध करण्यात आले होते. मात्र दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आरोग्य विभागाने युद्धपातळीवर काम करत ३०० बेड्सची व्यवस्था केली आहे.

या संदर्भात माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘आरोग्य विभागाने केलेल्या तयारीचा आज पुन्हा एकदा सविस्तर आढावा घेतला असून शहराच्या विविध भागांत तीन ठिकाणी ३०० विलगीकरण बेड्स सज्ज केले आहेत. महापालिकेने पूर्ण क्षमतेने तयारी केलेली असून यासाठी सर्व पातळ्यांवर सर्वच घटकांचे सहकार्य घेतले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची जबाबदारीने काळजी घ्यायला हवी’.