Coronavirus : 500 गरजूंना नाश्ता व जेवणाची सोय ; हडपसर-गोसावी वस्तीमधील समाजसेविकेचा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मागिल दहा-बारा दिवसांपासून दररोज दुपारी नाश्ता आणि सायंकाळी सुमारे 500 गरजूंना दिला जात आहे. हडपसर आणि परिसरातील गरजूंना नाश्ता पॅकेटमध्ये, तर जेवण घरोघरी त्यांच्या थाळीमध्ये दिले जात आहे, असे गोसावीवस्तीमधील समाजसेविका मयुरी बामणे यांनी सांगितले.

बामणे यांनी कोणताही गाजावाजा न करता भुकेल्यांसाठी जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. जास्तीत जास्त गरजूंसाठी ही सेवा देण्याचा मानस आहे. समाजसेवेचे व्रत हे रक्तात असावे लागते, त्यासाठी फक्त मळमळ नाही, तर मनापासून तळमळ असणे अत्यंत गरजेचे आहे. गाडी, बंगाल, हवेली, मालमत्ता, धनदौलत असून चालत नाही, तर दानतही महत्त्वाची असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मागिल दहा-बारा दिवसांपासून हॉटेल, दुकाने, खाद्यपदार्थ विक्री सर्वत्र बंद आह. त्यामुळे निरधारांना उपाशीपोटी न ठेवता दोन घास भरवण्याचा ध्यास बामणे यांनी घेतला. दररोज दुपारी बारा वाजता कल्पना बामणे, अरुण पवार, रेखा चव्हाण, पूनम चव्हाण, मृणाली पवार, ऋषिकेश बामणे, सचिन शिंदे, आप्पा धोत्रे यांच्या सहकार्याने वस्तीमधील आणि रस्त्यावरील उपाशीपोटी असणाऱ्यांना पोहे, उपीट, शिरा, मसाला भात नाश्त्यासाठी देण्यासाठी धडपड करीत आहेत. तर सायंकाळी पुलाव भात, खिचडी भात, डाळ भात, सांबर भात असा मेनू जेवणामध्ये देत आहेत. त्याचबरोबर 24 तास कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांसाठीही नाश्ता आणि जेवण देण्यासाठी त्यांच्याकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहन शेलार यांच्याकडून या कामासाठी आर्थिक सहकार्य लाभल्याचे मयुरी बामणे यांनी सांगितले.