Pune : महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नोकरीच्या आमिषाने राष्ट्रीय कबड्डीपटू तरुणींची फसवणूक करणार्‍या महिला पोलीस कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. विद्या दीपक साळवे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. परिमंडळाचे पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी हे आदेश काढले आहेत. विद्या साळवे यांची सध्या हडपसर पोलीस ठाण्यात नेमणूकीला होत्या. खडकी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

विद्या साळवे यांनी आपली पुणे महापालिकेत ओळख असल्याचे सांगून तेथील आरोग्य विभागात लिपिक म्हणून नोकरी लावण्याचे आमिषाने दोघींकडून साडेसात लाख रुपये घेतले होते. नोकरी मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर या तरुणींनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. तेव्हा विद्या साळवे हिने ३ लाख रुपये परत दिले. त्यानंतरही उरलेले साडेचार लाख रुपये परत न करता टाळाटाळ केल्याने या तरुणींनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली होती.साळवे यांचे वर्तन पोलीस खात्याच्या शिस्तीस धरुन नसून, आर्थिक लाभापोटी पोलीस अंमलदार पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.