पुणेकरांची मनं जिंकली ‘या’ 71 वर्षीय महिलेनं, अशा बनल्या ‘ट्रॅफिक काकू’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील बहुतांश शहरांप्रमाणेच पुण्यातही फुटपाथवरून सायकल आणि बाईक चालवण्याची समस्या नेहमीचीच आहे. जेव्हा वाहतूक कोंडी होते, तेव्हा काही लोक ट्रॅफिक जाममधून बाहेर पडण्यासाठी फुटपाथचा शॉर्टकट सारखा वापर करतात.

अशा लाकांना रोखण्याची जबाबदारी एका ट्रॅफिक काकूंनी घेतली आहे. होय, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काम करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ज्येष्ठ महिलेचे नाव निर्मला गोखले आहे. त्यांचे वय 71 वर्षे आहे. त्या एसएनडीटी कॉलेजजवळील कॅनाल रोडवर वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम करतातना दिसतात. त्यांच्या या कामाचे कौतुक ट्रॅफिक पोलिसांनीही केले आहे.

ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत निर्मला गोखले फुटपाथवर उभ्या असलेल्या दिसत आहेत. त्या ट्रॅफिक जाममधून बाहेर पडण्यासाठी फुटपाथचा वापर करणार्‍या बाईकर्सना रोखताना दिसतात. पुण्यातील एसएनडीटी कॉलेजजवळ कॅनल रोडवर खुप वाहतूक कोंडी असते. अनेक लोक या वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी फुटपाथचा वापर करतात. यामुळे निर्मला गोखले काकूंनी हे काम हाती घेतले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेकप्रकारच्या कमेंट येत आहेत. असंख्य लोकांनी निर्मला गोखले काकूंच्या या कार्याचे कौतूक केले आहे. वाहतूक जागृतीसाठी त्यांचे हे नवे पाऊल असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी त्यांना वंडर वुमन आणि ट्रॅफिक काकू अशीही नावे दिली आहेत.

परंतु, ट्विटरवर शेयर करण्यात आलेल्या या व्हिडिओत त्यांचा आवाज ऐकू येत नाही. परंतु हे स्पष्ट दिसत आहे की, वाहतूक नियम खुलेआम पायदळी तुडवणार्‍या बाईकर्सना त्या समजावताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर त्या पीक अवर्समध्ये कोणीही बाईकस्वार फुटपाथचा वापर करणार नाही, याची काळजी घेतात.

त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अन्य दोन ज्येष्ठ नागरिक सुद्धा निर्मला गोखले काकूंच्या मदतीला आले आहेत. हे तिघेजण फुटपाथवर उभे राहून रस्ता मोकळा करणे आणि बाइकर्सना फुटपाथऐवजी मुळ रस्त्याचा वापर करावा, असे समजावून सांगताना दिसतात.