पुण्यात शेजारांच्या त्रासामुळे डिप्रेशनमध्ये महिलेची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यात शेजारांच्या त्रासामुळे एका विवाहितेने डिप्रेशनमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारच्या महिलांनी चारित्र्यावर संशय घेतल्याने विवाहिता डिप्रेशनमध्ये होती. सात दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे.

वैशाली राउळ (वय ३० ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दीपा युवराज दळवी आणि शिवानी चव्हाण ( रा. शनिनगर, आंबेगाव खुर्द) यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैशाली यांचे पती विजय राऊळ (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली आणि त्यांचे पती काही महिन्यांपासून आंबेगाव खुर्द परिसरातील शनिनगरमधील एका इमारतीत राहत होते. त्यांच्या शेजारी राहत असलेल्या दीपा आणि शिवानी यांनी वैशाली यांच्या चारित्र्यावर संशय घेत होत्या. त्यातूनच त्यांच्यात भांडण देखील झाले होते.

त्यामुळे वैशाली या मानिसक तणावात होत्या. या तणावातूनच त्यांनी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. याबाबत विजय यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक ए. आर. कवठेकर करीत आहेत.