पुण्यात पतीच्या आत्महत्येच्या ‘डिप्रेशन’मध्ये पत्नीची डुक्कर खिंडीत आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दारूच्या व्यसनात पतीने गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर पत्नीने डिप्रेशनमध्ये डुक्कर खिंड येथील डोंगरावरून उडीमारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आशा सोमनाथ रनसिंग (वय 35, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा रनसिंग या मूळच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहेत. पतीसह बालेवाडी भागात राहत होत्या. स्वतः धुनी-भांडी करत. तर पती मिळेल ते काम करत होते. दरम्यान पती सोमनाथ यांना दारूचे व्यसन होते. त्या व्यसनात त्यांनी दहा दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. यानंतर आशा या तणावाखाली होत्या. या डिप्रेशनमध्ये त्या रविवारी सकाळी चालत चालत डुक्कर खिंड येथील डोंगरावर आल्या आणि त्यांनी तेथून उडी मारून आत्महत्या केली.

एका महिलेने उडी मारल्याची माहिती मिळताच वारजे आणि कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांना ससून रुग्णालयात नेले. पण त्यांची ओळख पटत नव्हती. यावेळी पोलिसांनी फोटोच्या आधारे त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. त्यावेळी आशा यांच्या वडिलांचा शोध लागला. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला. अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.