Pune : हडपसर-काळेबोराटेनगरमधील महिला पाण्यासाठी काढणार आक्रोश मोर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  मागिल दोन वर्षांपासून एक दिवसाआड रात्री-अपरात्री आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याने हडपसर-काळे-बोराटेनगर (प्रभाग क्र.26) मधील महिला कमालीच्या त्रासल्या आहेत. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, हंडा मोर्चा काढण्याचा प्रशासनाला जागे करण्याचा इशारा येथील महिलांनी दिला आहे. निवडणुका आल्या की, प्रत्येकजण येतो आणि पाणी, रस्ते, वीज सुविधा तातडीने देतो, अशी भरपूर नव्हे ढीगाने आश्वासने देतो आणि निवडणुका संपल्या की, पुन्हा सारे काही शांत होते. आम्हाला टँकरने पाणीपुरवठा केला जातो, त्यामुळे शहरामध्ये की आदिवासी भागात राहतो, असा सवाल येथील महिला वर्गाने उपस्थित केला आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार केली, की पाणीपुरवठा विभागाला तक्रार करा, असे सांगून प्रत्येकजण जबाबदारी झटकतो, आम्ही तक्रार तरी कोणाकडे करायची असा संतप्त सवाल येथील महिलांनी उपस्थित केला आहे.

हडपसर (स.नं.53, संतोषीमातानगर, काळेबोराटेनगर) नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, तक्रारींचा पाऊस पडला की, टँकर येतो. मात्र, पाण्याचा टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी गर्दी होते, कोरोनामुळे गर्दी करून नका, असे प्रशासन सांगत आहे. आम्ही पाणी तरी कसे मिळवायचे याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. या वस्तीमधील नागरिकांना बंद नळाद्वारे पाणी का दिले जात नाही. मागिल वर्षभरापासून कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. तरीसुद्धा पाण्यासाठी रात्र रात्र जागून काढावी लागते, त्यातून गढूळ आणि दूषित पाणी येत असल्याने साथीच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे, अशी व्यथा कल्पना आल्हाट, सुलक्षणा बोनंदर, श्वेता तलवार, लहू शिंदे, संदीप राऊत, शोभा लगड, अनिता घुगे, कल्पना जठाडे, सुनीता इरसुरे, हसीना शेख, विठाबाई सोंगार या महिलांनी मांडली. त्या म्हणाल्या की, रात्री-अपरात्री आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याची समस्या गंभीर बनत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करावा. तोंडी आणि लेखी तक्रारी वारंवार केल्या आहेत. मात्र, पालिका अधिकाऱ्यांकडून अद्याप दखल घेतली गेली नाही. आम्ही महापालिका हद्दीमध्ये राहत असूनही टँकरने पाणीपुरवठा का केला जातो, आम्ही कर भरतो, त्यामुळे बंद नळाद्वारे शुद्ध आणि वेळेवर पाणीपुरवठा करावा, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

परिवर्तन महिला आधार केंद्राच्या शोभा लगड म्हणाल्या की, लष्कर पाणीपुरवठा केंद्राला पाणीपुरवठा सुरळीत करावा, यासाठी वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र, त्याची अद्याप अधिकाऱ्यांनी दखल गेतली नाही. मागिल दीड वर्षांपासून पाण्यासाठी आम्ही झगडत आहोत. रात्री-अपरात्री पाणी सोडतात, त्यामुळे नोकरदार महिलांना दिवसभर काम करून पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. आम्ही पालिकेला कर भरतो, त्यामुळे पालिका प्रशासनाने आम्हाला शुद्ध आणि वेळेवर पाणी दिले पाहिजे. चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर येथील महिला एकत्र येऊन हंडा मोर्चा काढून प्रशासनाला जागे करू, असा इशारा त्यांनी दिला.

कल्पना जठाडे म्हणाल्या की, पाणी समस्या गंभीर आहे. येथील अर्ध्या गल्लीमध्ये पाणी येते, इतरांना पाणी मिळत नाही. रात्री तीन वाजेपर्यंत पाण्यासाठी जागे राहतो, पाण्याची वेळ निश्चित नाही. तीन दिवसांतून एकवेळ पाणी येते, त्यामुळे येथील नागरिकांना टँकरने पाणी मागवावे लागते. नळाला पाणी येत नसल्याने येथील महिला कमालीच्या त्रासल्या आहेत, अशा शब्दात त्यांनी महिलांची व्यथा मांडली.

संदीप राऊत म्हणाले की, स.नं.53 हा भाग पालिकेचे शेवटचे टोक आहे, त्यामुळे येथील नागरिकांना पाणी मिळत नाही, असे सांगितेल जात आहे. मात्र, येथील नागरिक पालिका प्रशासनाला कर भरतात, तरीसुद्धा पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे, ही बाब अत्यंत वाईट आहे. माता-भगिनींना एक-दोन दिवसाआड रात्री-अपरात्री पाण्यासाठी जागरण करावे लागत आहे, त्यामुळे पालिका प्रशासनाने पाण्याची तातडीने सुविधा उपलब्ध करून दिले पाहिजे. या परिसरात पाण्याची टाकी बांधली आहे, मात्र, ते काम थंडावले आहे. त्याचे काम तातडीने पूर्ण असे त्यांनी स्पष्ट केले.

हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता गौतम गावंड म्हणाले की, रामटेकडी पाण्याच्या टाकीची क्षमता मर्यादित आहे. पाणीपुरवठा होणारा विस्तार जास्त आहे. त्यातच संतोषीमातानगर हा परिसर नेटवर्कमध्ये शेवटचा आणि उंचावर असल्याने मर्यादित स्वरूपात पाणीपुरवठा होत आहे. काळेबोराटेनगरमध्ये पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच येथील नागरिकांची पाण्याची समस्या सुटेल, असे त्यांनी सांगितले.