Pune : महिला पोलिसाने स्वतःबरोबर कुटुंबीयांना कोरोनातून सावरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  दीड वर्षाचा मुलगा, त्यानंतर स्वतःबरोबर पती आणि वडिलांना कोरोनाने अखेर गाठलेच. कुटुंबाला धीर देत आठवडाभर घरातच उपचार घेऊन कोरोनाला हाकलून लावले. सुरुवातीला ओढाताण व धावपळ झाली. मुलगा, पती आणि वडिलांना नियमित सकस आहार आणि वेळेत औषधोपचार घेऊन कुटुंब कोरोनामुक्त झाल्याचे हडपसर वाहतूक विभागातील महिला पोलीस नाईक मनिषा वायसे-वाघ यांनी सांगितले.

हडपसर वाहतूकच्या महिला पोलीस नाईक मनिषा वायसे-वाघ म्हणाल्या की, मुलगा शिवांस (दीड वर्ष) याला दोन दिवस ताप येत होता. त्यामुळे त्याची हडपसरमधील डॉ. कुरकुटे यांच्याकडे उपचारासाठी नेले असता त्यांनी कोरोनाची तपासणी करण्यास सांगितले. कोरोना तपासणीमध्ये मुलाला संसर्ग झाल्याचा अहवाल आल्यानंतर पायाखालची वाळूच सरकली. पोलीस खात्यातील वाहतूक विभागात नोकरी म्हणजे दररोजची लढाई सुरूच असते. त्यामुळे लगेच स्वतःबरोबर पती अमित वाघ (वय 34), वडिल चंद्रकांत वायसे (70) यांची तपासणी करून घेतली. कोरोनाबाधित अहवाल आल्यामुळे घरामध्येच क्वारंटाईन केले. चौदा दिवस घरामध्ये राहून घाबरून न जाता कुटुंबीयांना बळ देत औषधोपचार सुरू ठेवले. अवघ्या सात दिवसांत कोरोनावर मात करण्यात यश मिळाले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मुलाला दररोज जास्तीत जास्त चांगला आहार दिला. स्वतःबरोबर कुटुंबीयांनाही त्याच पद्धतीने आहार आणि औषधे दिली. लवकरच कोरोनातून बाहेर याल, असा विश्वास डॉक्टरांनी दिला होता. संकटसमयी एकमेकाला धीर देऊन आधार देण्याची अत्यंत गरज आहे. उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मुलाला बरे वाटू लागले. आमचा आत्मविश्वास वाढला आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. स्वत:बरोबर पती आणि वडिलही कोरोनाबाधित असल्याने डॉक्टरांकडून मिळालेल्या गोळ्या घेतल्या. घराबाहेर न जाता घरात राहून औषधोपचार घेऊन कोरोनाला हरवू शकलो, ही बाब निश्चितच चांगली आहे. वायसे कुटुंबीयांच्या लढाईचे, धाडसाचे आणि धीरोदात्त जिद्दीचे सध्या परिसरात आणि पोलीस खात्यातही कौतुक होत आहे. “एकमेकांना धीर देत, घाबरून न जाता खंबीरपणे सामना केला, तर कोणतेही संकट परतवून लावता येते. कोरोना महामारीच्या आजारातून रणरागिनीने स्वतःबरोबर कुटुंबाला सावरले ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे. मागिल काही महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळत नाही, रेमडिसिव्हर इंजेक्शनची कमतरता अशी भयावह परिस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येकाने कामाशिवाय घराबाहेर पडू नये, गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे, तोंडाला मास्क लावणे स्वतःबरोबर समाजाच्या आरोग्यासाठी हिताचे आहे, असा सल्ला वायसे-वाघ यांनी सांगितले.

कोरोना महामारीने जगाला विळखा घातला आहे. आरोग्याची कसलीही तक्रार वाटू लागली, तर लगेच डॉक्टरांकडून उपचार करून घ्या. घाबरून जाऊ नका, सकारात्मक राहा, रक्ताच्या नात्यासह मित्र परिवाराला आधार द्या, आता ती गरज आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळा इतरांनाही पाळण्यासंबंधी प्रबोधन करा, ही तुमच्या-आमच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. स्वतःबरोबर इतरांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचे पालन करा, असे आवाहन वायसे-वाघ यांनी केले आहे.