Pune : महापालिकेच्या दिव्यांग अधिकारी व कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’

पुणे – राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेमध्ये काम करणारे दिव्यांग अधिकारी आणि कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची मुभा देण्यात आली आहे. हे अधिकारी अथवा कर्मचार्‍यांनी महापालिका कार्यक्षेत्र सोडून जावू नये तसेच आवश्यक्तेनुसार कार्यालयामध्ये उपस्थित राहाण्याची सूचना मिळाल्यास तत्काळ उपस्थित राहाणे मात्र बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढल्याने राज्यात लॉकडाउन लावण्यात आला आहे. लॉकडाउनमध्ये सरकारी कार्यालयातील उपस्थिती १५ टक्क्यांपर्यंत मर्यादीत करण्यात आली आहे. मात्र, कोरोेनाशी प्रत्यक्षात लढा देणारी आरोग्य व महापालिका यंत्रणांना ५० टक्के व गरजेनुसार १०० टक्क्यांपर्यंत उपस्थित राहाण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, शासकिय तसेच स्थानीक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये दिव्यांग अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या बर्‍यापैकी आहे.

दिव्यांग व्यक्तिंची रोग प्रतिकारकशक्ती सर्वसामान्यांच्या तुलनेत तितकिशी चांगली नसल्याने अडचणींचा सामना करणे कष्टप्रद व त्रासदायक होत असल्याचे निदर्शनास आल्याने राज्य शासनाने सर्व दिव्यांग अधिकारी व कर्मचार्‍यांना कार्यालयात उपस्थित राहाण्यापासून सूट देउन ‘वर्क फ्रॉम होम’ ची मुभा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दोन दिवसांपुर्वी दिव्यांग अधिकारी व कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत.

हे आदेश देतानाच संबधित विभागप्रमुखांनी दिव्यांग कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करता येतील अशी कामे सोपवावीत. या कर्मचार्‍यांच्या सुटीमुळे कार्यालयीन कामकाजात काही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. दिव्यांग कर्मचार्‍यांनी त्यांच्या कार्यालयाकडील महत्वाच्या व तातडीच्या शासकिय कामकाजाचा निपटारा होण्याच्या दृष्टीने त्यांचे मोबाईल क्रमांक तसेच ई मेल आयडी कार्यालयास उपलब्ध करून द्यावेत. मोबाईल सुरू ठेवावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. पुणे महापालिकेत 142 दिव्यांग अधिकारी व कर्मचारी आहेत.