पुणे शहरातून मजूर घराकडे परतण्यास सुरूवात, झोन-5 मधून 250 कामगार रवाना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – परराज्यातील नागरिकांना गावी जाण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आज शहरातील बिबवेवाडी परिसरातील अडीचशे मजूर मायदेशी पडतले. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने 8 ट्रॅव्हल्सने त्यांना पाठविण्यात आले. विशेष म्हणजे, पोलिसांनी सर्व तपासणी करून त्यांना पाठविले आहे. त्यावेळी मजुरांनी पोलिसांचे पाणावलेल्या डोळ्यांनी आभार मानले.

पुणे आणि मुंबईत मजूर वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊनमुळे हा वर्ग अडकून पडला आहे. ते गावी जाण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र लॉकडाऊन झाल्याने ते अडकले. जस-जसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तसा कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे राज्य शासनाने या मजुरांना मायदेशी जाण्यास परवानगी दिली. परंतु, त्यांची नोंदणी, वैद्यकीय प्रमाणपत्र अश्या काही अटी घालत पोलिसांना त्यांच्या नोंदी करून जाण्याची आदेश दिले होते.

त्यानुसार पुणे पोलिसांच्या 30 पोलीस ठाण्यात या कामगार वर्गाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसात जवळपास 28 हजार नोंदणी झाली आहे. पोलिस उपायुक्त बच्चनसिंग व उपायुक्त सारंग आवाड यांच्या देखरेखाली सर्व पडताळणी करून कामगारांना पाठविण्याचे नियोजन केले जात आहे.

परिमंडळ पाचकडून प्रत्येक पोलीस ठाण्यात नोंदणी करून त्यांना पाठविण्याचे काम सुरू केले आहे. यावेळी बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामगारांना सामाजिक कार्यकर्ते मेघराज राठी यांच्या मदतीने पाठविण्यास तयारी सुरु केली. त्यानुसार अडीचशे कामगार बुधवारी रात्री आठ ट्रॅव्हल्स बसमधून पाठविणयात आले. गावी जाताना त्या कामगारांना पोलिसांकडून मास्क व सॅनिटायझरचे वाटप केल्याने सर्व नागरीकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल फुलारी, उपायुक्त सारंग आवाड, सुहास बावचे, वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे, मुरलीधर करपे व इतर उपस्थित होते.

तीन दिवसात 3 हजार नोंदणी

परिमंडळ पाचच्या एकूण 6 पोलीस ठाण्याअंतर्गत 3 हजार 99 मजुरांची नोंदणी तीन दिवसात झाली आहे. अजून नोंदणी सुरू आहे. त्यात आता सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने नोंदणी झालेल्या कामगारांना पाठविण्यात येत आहे. त्यानुसार बुधवारी रात्री अडीचशे कामगार राजस्थान येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांचे पूर्ण माहिती व तपासणी कररून पाठविले आहे.
सुहास बावचे, पोलीस उपायुक्त, झोन 5

विशेष पोलीस अधिकाऱ्यांची मोठी मदत…

शहरात पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्याने विशेष पोलीस अधिकारी नेमण्यात येत आहेत. परिमंडळ 5 मध्ये 4 हजार विशेष पोलीस अधिकारी काम करत आहेत. त्यांची मोठी मदत होत आहे. अन्यधान्य, दूध पुरविण्यापासून ते सोशल डिस्टसिंग पालण्याबाबत जनजागृती करावी याची माहिती देत आहेत. तर प्रत्येक भागात जंतुनाशक फवारणी देखील करण्यात येत आहे.
तसेच पोलिसांना अडीअडचणीचे कॉल आल्यानंतर त्याठिकाणी जाऊन देखील हे एसीपीओ काम करत आहेत, असे देखील उपायुक्त बावचे यांनी सांगितले.

अशी देखील मदत
दोनच दिवसापूर्वी एका कुटुंबात कुकरच्या स्फोट झाला होता. त्यावेळी देखील पोलीस आणि अग्निशमन पोहचण्या आधी सर्व प्रथम हे विशेष अधिकारी मदतीला धावून गेले. त्यामुळे पोलिसांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.