Pune : हडपसर- गांधी चौकातील मजूर अड्ड्यावर रोजगारासाठी गर्दी वाढतेय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उड्डाण पुलामुळे उन्हापासून बचाव होत आहे. मात्र, कोरोनापासून बचाव होण्यासाठी पर्याय उपलब्ध नाहीत. तसेच पोट भरण्यासाठी दुसरा पर्यायही मिळत नाही. मागिल पंधरा दिवसांपूर्वी सुनासुना वाटमारा मजूर अड्डा पुन्हा मजुरांच्या गर्दीने फुलू लागल्याचे दिसून येत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मागिल आठवड्यापासून पुन्हा एक एक मजूर हडपसर गांधी चौकातील उड्डाण पुलाखाली येऊ लागला आहे. कोणी तरी हाताला काम देईल आणि रोजगार मिळेल, अशी त्यांची भाबडी आशा अजूनही तशीच आहे. मात्र, बांधकाम व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय बंद असल्यामुळे आता रोजगार मिळणे दूरापास्त झाले आहे. कोरोना आजार बरा होऊ दे, आम्हाला रोजगार मिळू दे, असे मागणे भगवंताकडे या मंडळींकडून केले जात आहे.

हडपसर गांधी चौकात हजारोंच्या संख्येने मजूर रोजगारासाठी थांबत होते. मात्र, कोरोनाच्या भीतीने अनेकांनी गाव गाठले. त्यामुळे मजूर अड्ड्यावरील गर्दी ओसरली होती. उद्योग-धंदे बंद आहेत, त्यामुळे रोजगार मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक मजुरालाही हे मान्य आहे. तरीसुद्धा भाबडी आशा मनामध्ये धरून पुरुष-महिला वर्ग सकाळी भाकरतुकडा घेऊन उड्डाण पुलाखाली येतो. दुपारी बारा-एक वाजेपर्यंत रोजगार मिळेल अशी त्याला आशा असते. रोजगार मिळाला नाही, तरी कोणी तरी काही धान्याचे कीट तरी देईल, असे त्यांचे मन सांगते. मात्र, यातील एकही गोष्ट त्यांच्या पदरी पडत नाही. मात्र, मजूरअड्ड्यावर येणारा कामगारवर्ग येथे आल्याशिवाय थांबत नाही. पोलीस येतात, गर्दी करू नका सांगतात. त्यावेळी थोडे अंतर ठेवून उभे राहतात. तोंडाला मास्क लावलेले असतात. एखादी दुचाकी किंवा कार उभी राहिली, तर त्यांना रोजगार मिळेल अशी आशा वाटते.

कोरोनाच्या भीतीने ठेकेदारही आता मजूर अड्ड्यावर फिरकत नाहीत. कामधंदे बंद आहेत, त्यामुळे रोजगार मिळत नाही, असे असूनही ही मंडळी मजूर अड्ड्यावर का येतात. गावाकडे शेतीभाती नाही, घरदार नाही, शिक्षण नाही, त्यामुळे जिथे जाऊ तेच आमचे गाव आणि तिथेच आमचे घर अशी केविलवाणी अवस्था मजूर अड्ड्यावरील अनेक मंडळींची आहे. शिक्षण नसल्यामुळे नोकरी नाही, त्यामुळे मिळेल ते काम करायचे आणि पोटाची खळगी भरायची अशी परिस्थिती या मजूरवर्गाची आहे. मागिल वर्षी संस्था-संघटनांनी अन्नदान मोठ्या प्रमाणावर केले होते. मात्र, यावर्षी अद्यापपर्यंत कोणीही दानशूर फिरकले नाहीत, अशी खंतही या मंडळींकडून व्यक्त केली जात आहे.