Pune : चिंताजनक ! पुणे जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे 18 रुग्ण; ‘या’ पध्दतीनं काळजी घ्या, जाणून घ्या

पुणे/बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसीस या आजाराने ग्रासलं असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसापासून म्युकरमायकोसीसची लक्षणे असणाऱ्या रुग्णाची संख्या वाढू लागली आहे. दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात बारामती आणि जुन्नर तालुक्यात म्युकरमायकोसीसचे १८ रुग्ण असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोणीही घाबरून न जाता डोळ्यांचे डॉक्टर किंवा कान, नाक व घसा तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मधुमेह असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींना त्यांच्या आजाराच्या उपचारादरम्यान स्टीरॉइड्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला असेल, तर काही रुग्णात म्युकरमायकोसीसची लक्षणे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात २००, गुजरातमध्ये १००, दिल्लीमध्ये १०० रुग्णांना म्युकरमायकोसीस झाल्याची नोंद झाली आहे. परंतु प्रत्येक कोरोनाबाधिताला हा आजरा होईलच असे नाही. किंवा प्रत्येक कोरोनाबाधित मधुमेही व्यक्तींना स्टीरॉइड्स दिलेले असले, तरी होत नाही. कोणत्याही कारणानं ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, अशा व्यक्तींना हा बुरशीजन्य जंतूंचा संसर्ग होत असल्याचे सांगितले.
पुणे जिल्ह्यात वर्षभरात १८ रुग्ण आढळून आले आहे. बारामती १७ रुग्ण असून ज्या रुग्णांना टॉसिलीझुमॅब, रेमडेसिविर इंजेक्शन दिले आहे किंवा पाच दिवसांपेक्षा जास्त ऑक्सिजन दिला आहे, त्यांनाच नाकामध्ये म्युकरमायकोसिसची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. तर जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी येथे ६५ वर्षीय वृद्धेला म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला आहे. या वृद्धेला कोरोनाची लागण झाल्याने तिच्यावर पुण्यातील समर्थ रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. चर्च दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले होते.

म्युकरमायकोसीसची लक्षणे
साधारण म्युकरमायकोसीसचे सहा प्रकार आढळतात. परंतु सध्या नाकामधून मेंदूकडे जाणारा, ‘ऱ्हायनोसेरेब्रल’ हा प्रकार सर्वांत जास्त आढळत आहे. रुग्णाला चेहऱ्याच्या एका बाजूला, गालांच्या हाडांवर सूज येणे, डोकं कमालीचं दुखणे, नाक चोंदल्यासारखं वाटून नाकानं श्वास घ्यायला त्रास होणे, ताप येणे. काही वेळेस सुरुवातीला रुग्णांच्या नाकाच्या वरच्या बाजूवर कपाळाखाली किंवा तोंडामध्ये टाळ्यावर काळे व्रण दिसून येणे, डोळे जळजळ करणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे आदी लक्षणे दिसतात. तसेच म्युकरमायकोसीसचे फुफ्फुसांमध्ये, पोटामध्ये, त्वचेवर, आणि रक्ताभिसरणातून सर्व शरीरभर पसरणारेही प्रकार आहेत.

अशी काळजी प्रथम घ्यावी
कोरोनाची लागण झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या आठवड्यांमध्ये नाक नॉर्मल सलाइनने स्वच्छ करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण १५ व्या व २२ व्या दिवशी तपासून पाहणे. म्युकरमायकोसिस आहे की नाही हे पाहण्याकरिता नाकातील स्वॅब तपासून घ्यावा.

आजार जुनाच पण दुर्लक्ष नको
म्युकरमायकोसिस हा आजार दुर्मिळ असला तरी नवा नाही. यापूर्वीही या आजाराची लागण झालेले रुग्ण आहेत. त्यांनी वेळीच उपचार घेत यावर मात केली आहे. त्यामुळे कोणीही घाबरून न जाता म्युकर मायकोसिसची लक्षणे दिसू लागताच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे. असे बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सदानंद काळे यांनी सांगितले.