Pune : येरवड्यातील लक्ष्मी नगरमध्ये वाहनांची तोडफोड-जाळपोळ, परिसरात तणाव

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – येरवड्यातील लक्ष्मी नगर भागात टोळक्याने रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकींची तोडफोड करत त्या जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे लक्ष्मीनगर भागात तणाव निर्माण झाला आहे. 6 दुचाकींचे नुकसान झाले असून, 3 संशयित तरुणांना पकडण्यात आले आहे.

याप्रकरणी सोमनाथ गायकवाड (वय 35, रा. लक्ष्मीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड हे लक्ष्मीनगर भागात राहण्यास आहेत. हा परिसर दाटीवाटीचा आहे. यामुळे अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभा केलेली असतात. दरम्यान मध्यरात्री अचानक दुचाकीवर आलेल्या टोळक्यानी दशहत माजवत गोंधळ घातला. तसेच 6 दुचाकींची तोडफोड करत त्या दुचाकी पेटवून दिल्या. यात 2 दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तर 4 दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले आहे. हा प्रकार समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, तणाव देखील निर्माण झाला आहे. माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक ननावरे व त्यांच्या पथकाने या ठिकाणी धाव घेतली. तसेच तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.