Pune : लग्नासाठी तरुणीकडे तगादा, नातेवाईकांमध्ये बदनामी केल्याच्या नैराश्येतून तरुणीची आत्महत्या, तिघांविरोधात FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणीला लग्नासाठी वारंवार टॉर्चर करुन तिची नातेवाईकांमध्ये बदनामी केली. तसेच तिला फोन करुन धमकी दिली. याशिवाय सोशल मीडियावर तिचे फोटो टाकून तिची बदनामी केली. वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 एप्रिल 2021 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास सज्जनगड कॉलनी, रहाटणी येथे घडली.

श्रद्धा ज्ञानेश्वर कोकणे (वय-24) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी अजिंक्य जालिंदर साठे, जालिंदर साठे, छाया जालिंदर साठे (सर्व. रा. मुंजोबा मंदीरा जवळ, पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मयत तरुणीचा भाऊ ऋतिक ज्ञानेश्वर कोकणे (वय-21 रा. सज्जनगड कॉलनी, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपी अजिंक्य याने मयत श्रद्धा सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्याला कोकणे कुटुंबाने नकार दिला. मात्र, आरोपींनी श्रद्धा आणि अजिक्य यांचे लग्न लावून देण्यासाठी तगादा लावला होता. तसेच श्रद्धाने अजिंक्य सोबत लग्न करावे यासाठी तिला टॉर्चर केले.

कोकणे यांनी तिचे लग्न अजिंक्यसोबत लावून देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तरुणीची पाहुण्यामध्ये बदनामी केली. तिचे लग्न जमू दिले नाही. तरुणीचे व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, फेसबुकवर बदनामीकारक फोटो टाकून तिला फोनवर धमकावले. या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरामध्ये फॅनच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान तरुणीने तिच्या मोबाईल फोनमध्ये असलेल्या नोटपॅडवर आरोपींनी त्रास दिल्याचे इंग्रजीत लिहून ठेवले होते. पोलिसांनी तिच्या सुसाईड नोटवरुन आरोपींच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.