Pune : माहिती पुरवत नसल्याच्या कारणावरून सराईतांकडून तरूणावर वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – माहिती पुरवत नसल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगार व त्याच्या दोन साथीदारानी तरुणावर कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना येरवडा भागात घडली. यावेळी आरोपींनी परिसरात गोंधळ माजवत दहशत देखील माजवली.

याप्रकरणी संदीप उर्फ पप्पू पगारे, मोईन काळू शेख (वय 20), आलीम शेख (रा. सर्व, लक्ष्मीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विवेक विद्यागज (वय 21) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोईन शेख याला पकडले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी ओळखीचे आहेत. दरम्यान यातील संदीप उर्फ पप्पू हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यावेळी एका तरुणाच्या घरचे अमच्याबाबत काय चर्चा करतात, हे का सांगत नाही, असे म्हणून वाद घातला. तसेच त्याला शिवीगाळ करत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी येथून पसार झाले. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. एकाला पकडले असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.

You might also like