मांजरी बुद्रुक परिसरात 2 दुचाकींची समोरासमोर धडक, तरूणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मांजरी बुद्रुक परिसरात ही घटना घडली आहे.

राजू रावसाहेब सावंत (वय २४, रा. शंकरमठ, हडपसर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अपघातात अजय घाडगे, किरण जगताप, सुदर्शन घाडगे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी किरण जगताप यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय चंद्रकांत घाडगे (वय २१, रा. भवरावस्ती, पुâरसुंगी ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास राजू आणि किरण एका दुचाकीवर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव दुचाकीवर आलेल्या अजयने त्यांना समोरून धडक दिली. धडक इतकी भयानक होती की त्यात चौघेही गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झाल्याने राजू याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बेदरकारपणे दुचाकी चालविल्यामुळे अजयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. डी. पाटील अधिक तपास करीत आहेत

—चौकट—
दुचाकी घसरुन एकाचा मृत्यू
भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडीतील एअरपोर्ट रस्त्यावर घडला आहे. रवींद्र साधू जाधव (वय ४१, रा. येरवडा ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियंत्रण सुटल्याने दुचाकी स्लिप झाली. त्यात गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.