पुण्यात टेम्पोला पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – उभा केलेल्या टेम्पोला पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. चुकीच्या पद्धतीने टेम्पो उभा केल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले. वारजे येथील डुक्करखिंडजवळ हा अपघात घडला आहे. अपघात होताच चालक पसार झाला.

मोहम्मद शकील अब्दुल सत्तार (२7, रा. मानाजीनगर, नऱ्हे ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारत बेंझ कंपनीच्या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई राजू युसुफ शेख यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद हे खाजगी कंपनीत नोकरी करत होते. दरम्यान शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर चांदणी चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावर डुकरखिंड रोडवर एक भारत बेंझ कंपनीचा पांढरा टेम्पो वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून घरी जाणारे मोहम्मद सत्तार हे अचानक थांबलेल्या टेम्पोला जाऊन धडकला. मागून जोरदार धडक बसल्याने सत्तार हे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु गंभीर जखमी झाल्याने रविवारी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रामदास शेवते करत आहे.