पुण्यात दुभाजकाला भरधाव दुचाकी धडकली, तरूणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  भरधाव दुचाकी दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला आहे. मगरपट्टा रस्त्यावर हा अपघात झाला आहे.

पवन कुमार (वय २८,रा.मगरपट्टा सिटी, हडपसर) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र अँथोनी डिसुजा (वय ३४,रा.मगरपट्टा सिटी, हडपसर) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मगरपट्टा चौकातून दुचाकीस्वार पवन कुमार आणि त्याचा मित्र अँथोनी डिसुजा रविवारी सकाळी निघाले होते. दुचाकी भरधाव असल्याने पवन कुमारचे नियंत्रण सुटले आणि तो दुभाजकावर जाऊन आदळला. अपघातात पवन कुमारच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली असल्याचे दिसून आले. तर मित्र डिसुजा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान पवन कुमारचा मृत्यू झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रत्नदीप गायकवाड करत आहेत.