Pune : ‘कोरोना’तून बरा झालेल्या तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनातून बरा झालेल्या एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहकारनगर भागात हा प्रकार घडला आहे.
संदीप नागनाथ भोसले (वय ४५,रा.ओंकार सोसायटी, पद्मावती) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप यांच्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर संदीप नैराश्यात होते. दरम्यान, संदीप कोरोनाबाधित असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले होते. उपचारानंतर ते घरी आले होते. वैद्याकीय तज्ज्ञांनी त्यांना विलगीकरणात राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते ओंकार सोसायटीत एकटेच राहत होते.

पत्नी व दोन मुलांना त्यांनी वडिलांच्या घरी पाठविले होते. दरम्यान, संदीप यांचा भाऊ सकाळी नाश्ता घेऊन घरी आला. तेव्हा त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय सहकारनगर पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.